Teachers Constituency Elections Nagpur : नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी तब्बल 27 उमेदवारांनी दावेदारी दाखल केली आहे. यामध्ये अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार (NCP) 'बॅकफूटवर' आले असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भ ओबीसी सेलचे अध्यक्ष सतीश इटकेलवार आज आपला अर्ज मागे घेणार आहेत. मात्र अर्ज दाखल करताना आपल्याला इतर संघटनांचे समर्थन असून आपण हमखास निवडून येऊ असा दावा त्यांनी केला होता. तरी राजकीय वर्तुळात त्यांचा अर्ज मागे घेण्यात येणार अशी पहिल्या दिवसापासून चर्चा होती. तसेच पक्षाला आणि इतर उमेदवारांना इशारा देण्यासाठीच त्यांनी अर्ज दाखल केला होता असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत होता. हा अंदाज आज खरा ठरला आहे.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी होती. भाजपने उमेदवार बदलला तर पदवीधर मतदारसंघातील निकालाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपनेही सावध भूमिका घेतली. उमेदवार जाहीर करण्यासाठी गेल्या आठवड्यात मंगळवारपर्यंत भाजप आणि कॉंग्रेसचे 'पहले आप पहले आप' सुरु होते. नंतर भाजपकडून शिक्षक परिषदेचे उमेदवार म्हणून नागो गाणार (Nago Ganar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. त्यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. गेल्या निवडणुकीत फक्त दोन हजारांच्या जवळपास मतांच्या अंतरानेच गाणार निवडणून आले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिक्षकांना आपल्याबाजूने वळवण्यासाठी त्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
शिवसेना उमेदवारही अर्ज मागे घेणार?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अर्ज मागे घेणार असला तरी शिवसेना ठाकरे गट प्रणित शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे त्यांचा अर्ज मागे घेणार का? आणि काँग्रेस समर्थित उमेदवारासाठी मार्ग मोकळा करणार का? यासंदर्भात अजूनही प्रश्नचिन्ह आहेत.
नागपूर विभागात या उमेदवारांनी दाखल केले अर्ज
नागपूर विभागातून रामराव चव्हाण, सुधाकर अडबाले, मत्यूंजय सिंग, राजेंद्र झाडे, अजय भोयर, दीपराज खोब्रागडे, सुषमा भड, रविंद्र डोंगरदेव, बाबाराव उरकुडे, विनोद राऊत, सतीश जगताप, नरेंद्र पिपरे, गंगाधर नाकाडे, नागो गाणार, श्रीधर साळवे, सतीश इटकेलवार, उत्तमप्रकाश शहारे, नीलकंठ उइके, राजेंद्र बागडे, देवेंद्र वानखेडे, नीमा रंगारी, सचिन काळबांडे, प्रवीण गिरडकर, अतूल रुईकर, मुकेश पुडके, संजय रंगारी, नरेश पिल्ले या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.
ही बातमी देखील वाचा...