chandrakant khaire on Aurangabad city Renaming: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद (osmanabad) जिल्ह्याचे धाराशिव नामांतराची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. यावरून सतत राजकीय आरोप-प्रत्यारोप सुद्धा केली जातात. मात्र आता प्रत्यक्षात लवकरच या दोन्ही जिल्ह्यांचे नाव बदलली जाणार आहे. कारण औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचा दावा शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांनी केला आहे. तर कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) याची घोषणा करतील असेही खैरे म्हणाले आहे. 


काय म्हणाले खैरे... 


यावेळी बोलतांना चंद्रकांत खैरे म्हणाले की, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया कधी पूर्ण होणार अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील आपल्या भाषणात सांगितले की, हो आम्ही म्हणतोच संभाजीनगर आणि आहेच संभाजीनगर. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यानीच 8 मे 1988 रोजी हे नाव जाहीर केलेलं आहे. म्हणून आपण संभाजीनगर म्हणतो, पण काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला अधिकृतरीत्या कधी करणार. मात्र उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची अधिकृत प्रक्रिया पूर्ण केली असून, ते कधीपण जाहीर करतील असं खैरे म्हणाले. 


सभेत गाजणार नामांतराचा मुद्दा... 


औरंगाबाद जिल्ह्याच नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उद्धव ठाकरे यांची ८ जूनला शहरातील मराठवाडा सांस्कृतीत मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आतातरी शहराचे नाव बदलणार का ? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शिवसेनेकडून सुद्धा याच मुद्याला पुन्हा हात घालण्याची शक्यता आहे. तसेच सभेपूर्वी शिवसेनेकडून एक ट्रेलर सुद्धा जाहीर करण्यात आला असून, त्यात सुद्धा नामांतराचा मुद्दा उपस्थित केला गेला आहे. त्यात आता खैरेंनी केलेला दावा पाहता उद्धव ठाकरेंच्या सभेत पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे.