Agnipath Scheme Protest: केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. अनेक राज्यांमध्ये यावरून हिंसाचाराच्या काही घटना घडल्या आहेत. आंदोलकांनी रेल्वे गाड्यांना निशाणा करत अनेक गाड्या पेटवून दिल्या आहेत. तर याचा फटका आता देशभरातील रेल्वे प्रवाशांना बसत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे औरंगाबादसह मराठवाड्यातील जालना,नांदेडसह इतर जिल्ह्यातील प्रवाशांना सुद्धा याचा फटका बसताना पाहायला मिळत आहे. कारण गेल्या दोन दिवसात चार रेल्वे अग्निपथ विरोधात सुरु असलेल्या आंदोलनामुळे रद्द कराव्या लागल्या आहेत. 


तेलंगणात सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी तोडफोड करून रेल्वेला आग लावल्याने शुक्रवारी दोन रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. त्यांनतर दुसऱ्या दिवशी शनिवारी सुद्धा मनमाड-सिकंदराबाद अजिंठा एक्सप्रेस आणि श्री साईनगर शिर्डी रेल्वेस्टेशनवरून सुटणारी शिर्डी-सिकंदराबाद एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अग्निपथवरून सुरु असलेल्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका रेल्वे प्रवाशांना बसताना पाहायला मिळत आहे. 


औरंगाबादमध्ये पोलीस बंदोबस्त...


केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध म्हणून नॅशनल स्टुडंटस ऑफ इंडिया या संघटनेतर्फे क्रांती चौकात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र देशातील परिस्थिती पाहता पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली होती. त्यामुळे हे आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान त्यांनतर सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी क्रांती चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. 


हिंसाचारामागे कोचिंग सेंटर


बिहारमधील हिंसक निदर्शनांमागे अनेक कोचिंग सेंटरची भूमिका संशयास्पद असल्याची माहिती पटनाचे डीएम चंद्रशेखर सिंह यांनी दिली आहे. "हिंसक निदर्शना प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांच्या चौकशीत 7 ते 8 कोचिंग सेंटर्सनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून या लोकांच्या फोनवर हिंसक संदेश पाठवल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी 170 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यापैकी 46 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती चंद्रशेखर सिंह यांनी दिली.  


शांतता राखण्याचे आवाहन


बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी राज्यात परिस्थिती आता सामान्य होत असल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे. केंद्राने तरुणांसाठी चांगली योजना बनवली आहे. त्यातून त्यांना अनेक फायदे होतील, असे प्रसाद यांनी म्हटले आहे. काल आंदोलनकर्त्यांनी प्रसाद यांच्या घरावर हल्ला केला होता.