मुंबई : राज्यातील पर्यटन स्थळांची (Tourist Spot) अधिकाधिक प्रचार व प्रसिध्दी व्हावी याकरिता, माजी मिस इंडिया युनिव्हर्स नवेली देशमुख (Naveli Deshmukh) यांची सन 2024-25 या वर्षाकरिता राज्याची पर्यटन सदिच्छा दूत म्हणून महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे. त्यामुळे नवेली देशमुख या राज्यभरात पर्यटन सदिच्छा दूत म्हणून राज्यातील पर्यटन स्थळांची अधिकाधिक प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच, पर्यटन विभागातर्फे आयोजित केल्या जात असलेल्या मुंबई फेस्टीवल 2024 मध्येही प्रचार व प्रसिध्दीमध्ये सहभागी आहेत अशी माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे. 


पर्यटनमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "महाराष्ट्र राज्याला 720 किमीचा लाभलेला समृध्द समुद्र किनारा , उत्कृष्ट प्राचीन मंदिरे, अजिंठा वेरूळ सारखी इस.सन पूर्व दुसऱ्या शतकात लेणी, वन्यजीव, थंड हवेची ठिकाणे, राज्यातील विविध धार्मिक स्थळे ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची स्थाने आहेत. राज्यात देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे, हाच विचार घेवून महाराष्ट्र शासन राज्यात समृध्द आणि जबाबदार पर्यटन राबवत आहे. देशातील बहुतांश राज्यात पर्यटनाची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबवून पर्यटकांना आकर्षित करण्यात येते. त्याकरीता अनेक क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना सहभागी करून पर्यटन क्षेत्रातील विविध स्थळांची प्रसिद्धी करण्यात येत असते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याची ॲम्बेसेडर ऑफ यूथ टुरिझम म्हणून मिस इंडिया ठरलेली युवा नवेली देशमुख यांची राज्य शासनाने राज्याची पर्यटन सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे. यासंदर्भातील शासनाचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे.


नवेली देशमुख छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील...


पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख या छत्रपती संभाजीनगर येथील आहेत. नवेली या युथ आयकॉन म्हणून त्या विविध शासकीय विभागात योगदान देतात. राज्यातील पर्यटन स्थळांची जास्तीत जास्त प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी त्या पर्यटन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध पर्यटन महोत्सव, रोड शो विविध कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत. पर्यटन विभागातर्फे आयोजित केल्या जात असलेल्या मुंबई फेस्टीवल 2024 मध्येही प्रचार व प्रसिध्दीसाठी सहकार्य करत असल्याचे महाजन म्हणाले.


राज्यातील पर्यटन स्थळांचा प्रचार करणार : नवेली देशमुख 


पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, "राज्यातील पर्यटन स्थळांची जास्तीत जास्त प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी मी प्रयत्न करेन. नव्या पिढीची आयकॉन म्हणून काम करताना युवा पिढीला साजेसे प्रचाराचे उपक्रम पर्यटन विभागाच्या माध्यमातून राबवू. शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक पर्यटनाला महत्व देण्यासाठी तसेच जबाबदार पर्यटनाची प्रसिध्दी करणार आहे. पर्यटन विभागातर्फे आयोजित केल्या जात असलेल्या मुंबई फेस्टीवल 2024 मध्येही मी सहभागी असून, नऊ दिवस चालणाऱ्या या उपक्रमांचा जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Shark Tank India: 'शार्क टँक इंडिया 3' येणार प्रेक्षकांच्या भेटीस; कधी आणि कुठे पाहता येणार शो? या सीझनमध्ये काय असणार खास? जाणून घ्या..