नांदेड : प्रेमसंबंध ठेवण्यास नकार देत असल्याच्या कारणाने प्रेयसीने प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. आकाश लोकरे असं मृत तरुणाचं नाव असून तो विवाहित होता. प्रेयसीने भाऊ आणि मित्रांच्या मदतीने आकाशची हत्या केली.


नांदेड शहरातील आंबेडकरनगर परिसरात 12 फेब्रुवारीला रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. आकाश लोकरे या तरुणाचे त्याच परिसरात वास्तव्यास असलेल्या रोहिणी थोरातसोबत प्रेमसंबंध होते. हे प्रेमसंबंध आकाशची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच प्रस्थापित झाले होते. या दरम्यान आरोपी प्रेयसी रोहिणीने आकाशकडे पत्नीला सोडून माझ्याशी लग्न कर असा तगादा लावला होता. परंतु आकाश तिच्या या गोष्टीला कंटाळला होता आणि त्यामुळे तिच्याशी बोलणंही सोडून दिलं होतं.


रोहिणीने 12 फेब्रुवारीला रात्री आकाश लोकरेला घराबाहेर बोलावून घेतले आणि सुरुवातीला त्याच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु तो त्यातून बचावल्यानंतर आकाशची मित्रांच्या मदतीने चाकू, तलवारीने मारहाण करुन त्याची हत्या करण्यात आली. प्रेम संबंधास नकार देत असल्याने आणि पहिल्या पत्नीला सोडून आपल्याशी लग्न न करण्याच्या रागात प्रेयसीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं कळतं.


या घटनेविषयी मयत आकाश लोकरेच्या आईच्या फिर्यादीवरुन रोहिणी थोरात, प्रशांत थोरात, सतीश हाटकर, सुमीत हाटकर या चार जणांवर 302 कलमान्वये शिवाजीनगर पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आकाश लोकरेची हत्या ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणापासून शंभर फुटांवर पोलीस चौकी आहे तर दुसऱ्या बाजूला राज्याचे बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे घर आहे. ज्याठिकाणी सतत पोलीस फौजफाटा आणि तगडा पोलीस बंदोबस्त असतो. परंतु एवढी मोठी घटना घडत असताना आकाशच्या मदतीला कोणतीही यंत्रणा कामी न आल्यामुळे या परिसरातील सुरक्षा व्यवस्थे मात्र प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण खून प्रकरणाचा थरार मात्र सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला आहे. वारंवार शहरात वाढणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.