जळगाव : लैंगिक अत्याचार झालेल्या प्रकरणात तीन वर्षांच्या मुलीची साक्ष ग्राह्य धरत जळगाव न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनवल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगर देवळा येथील तीन वर्षीय बालिकेवर घराशेजारीच राहणाऱ्या किशोर भोई या 38 वर्षीय तरुणाने चॉकलेटचे आमिष देऊन 26 मार्च 19 रोजी राहत्या घरात अत्याचार केला होता. सदर बालिकेने घडला प्रकार आपल्या आईला सांगिल्यावर आईने पोलिसात फिर्याद दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास करत आणि साक्षीदार तपासणी करीत आरोपी किशोर भोई याला अटक केली होती.


घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय नलावडे यांनी पुरेसे पुरावे गोळा करीत जळगांव जिल्हा न्यायालयात आरोपीच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते. 29 नोव्हेंबर 19 रोजी या खटल्याच्या सुनावणीस जळगांव न्यायलायत सुनावणी सुरू झाली होती. या खटल्यात दहा साक्षीदारासह पीडित बालिकेची साक्ष ही न्यायलायत घेण्यात आली होती. न्यायलायत साक्ष देतांना पीडित बालिकेने न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांना अतिशय मुद्देसूद उत्तरे तर दिलीच या उलट आरोपीच्या वकिलांनी तिला विचारलेली प्रश्न ही तिने खोडून काढली.


या घटनेत पीडित मुलीने आत्मविश्वास पूर्वक दिलेली साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरत न्यायाधीश आर जे कटारिया यांनी आरोपी किशोर भोई याला मरेपर्यंच जन्मठेप आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी वकील अॅड केतन ढाके यांना या खटल्यात काम करताना तीन वर्षांच्या मुलीकडून साक्ष मिळविणे मोठे अवघड काम होते. मात्र तिने दिलेली साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरली असल्याच म्हटलं आहे.


केवळ तीन वर्षांच्या मुलीची साक्ष ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस मरेपर्यंत जन्म ठेपेची शिक्षा जाहीर केल्याच्या  निर्णयाचे महिलांनी स्वागत केले आहे. या निकालामुळे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना नक्कीच धाक बसेल आणि अशा घटना कमी होण्यास मदत होणार असल्याने या निर्णयाचा स्वागत महिला वर्गाने केले आहे.