Uddhav Thackeray on Maharashtra NCP Political Crisis : गेल्यावर्षी शिवसेनेत (Shiv Sena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 पेक्षा अधिक आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवत वेगळा गट तयार केला. या घटनेला एक वर्षे पूर्ण होत नाही तो अशीच बंडखोरी राष्ट्रवादीत (NCP) पाहायला मिळत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी 30 पेक्षा अधिक आमदारांना सोबत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान यावरूनच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. आधी पक्षातील लोकं फुटायचे आता पक्ष पळवला जातोय, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. यवतमाळ येथे माध्यमांशी ते संवाद साधत असून, यावेळी त्यांनी ही टीका केली आहे. 


यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्याची राजकीय परिस्थिती जशी दिसतेय तशी पाहतोय. राजकारणात फोडाफोडीचे प्रकार काही नवीन नाहीत. पण यापूर्वी पक्ष फोडला जात होता, मात्र आता पक्ष पळवला जात आहे. विशेष म्हणजे, पक्ष पळवल्यानंतर सुद्धा आम्हाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत माझ्या ज्या काही सभा झाल्या, तसेच इथे येताना रस्त्यात जागोजागी लोकं थांबलेली होती. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर लोकं येऊन सांगत आहे की, जे काही घडतंय ते वाईट आहे. ही परंपरा, पायंडा महाराष्ट्रासाठी वाईट आहे. पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत असल्याचे लोकं सांगत, असल्याचं ठाकरे म्हणाले. 


सध्या जाहीर सभा घेणार नाही...


मी आता जे काही राज्यभर फिरत आहे, त्यात जाहीर सभेचा आग्रह धरलेला नाही. पण गेल्या वर्षभरात राज्यभरातील आणि राज्याच्या बाहेरचे शिवसैनिकांसह पदाधिकारी वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या वेळेला येऊन मला भेटत आहे.  त्यामुळे मी असं ठरवलं आहे की, सध्या पावसाळा सुरु असून, ग्रामीण भागातील बहुतांश शिवसैनिक शेतकरी आहे. त्यामुळे सध्या जाहीर सभा वैगरे न घेता, मी माझ्या कार्यकर्त्यांना भेटत आहे.कार्यकर्त्यांकडे जाऊन थेट त्यांना भेटण्याचा माझा उद्देश आहे. तसेच त्यांच्याकडून आणखी काही गोष्टी समजून घेता आल्यातर त्या समजून घेण्याचा प्रयत्न असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. 


विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या चौकटीतच निर्णय घ्यावा लागणार 


शिंदे गटाच्या 16 आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटीस बजावली असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, याचा काहीही राजकीय अर्थ काढण्याचा प्रयत्न केला तर, सुप्रीम कोर्टाने जो अर्थ काढून दिला आहे त्याच्या पलीकडे कोणालही पाहता येणार नाही. न्यायालयाने अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात त्यांचा निकाल दिला आहे. त्या निकालच्या चौकटीतच विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार आहे. जर त्यांनी त्या चौकटीच्या बाहेर निर्णय दिला तर ते लोकशाहीला धरून होणार नाही, असेही ठाकरे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Uddhav Thackeray Vidarbha Visit: उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात; दोन दिवस विदर्भात, पोहरादेवीचं दर्शन घेणार