Maharashtra Politics: शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडत अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आणि उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. इथवर शिंदे गटातले मंत्री, आमदार, नेत्यांच्या पचनी पडलं, पण आता घोडं अडलं होतं ते अर्थखात्यावरुन. पण कालच्या दिल्लीतल्या अमित शाहांसोबतच्या भेटीनंतर अर्थखात्यावरचा तिढा सुटल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थखातं (Finance Ministry) देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. इतकंच नाही तर अर्थखात्यासोबत सहकार खातंही अजित पवारांना मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे असलेलं अर्थखातं अजित पवारांकडे जाणार हे जवळपास निश्चित असल्याची माहिती मिळत आहे.
याशिवाय कृषी, अन्न आणि औषध प्रशासन, महिला आणि बाल विकास मंत्रालय, युवक कल्याण मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालयही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाणार असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या अर्थखात्याला विरोध दर्शवणाऱ्या शिंदे गटाची काय भूमिका असेल? हे पाहावं लागेल.
अजित पवारांच्या शपथविधीनंतर राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. अजित पवारांसोबत 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीला 12 दिवस उलटूनही अद्याप खातेवाटप जाहीर झालेलं नाही. खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये धूसफूस सुरू असल्याचं बोललं जात होतं. विशेषतः अजित दादांच्या येण्यानं शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार नाराज होत असल्याचं समोर आलं होतं. अनेकांनी तर उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत, मंत्रीपदावरही दावे ठोकले होते. अशातच आता भाजप हायकमांडच्या हस्तक्षेपानंतर तिनही पक्षांमधील खातेवाटपाचा तिढा सुटल्याचं बोललं जात आहे.
अर्थ खातं दादांकडेच? शिंदेंचे आमदार नाराज?
शिंदेंसोबत काही आमदारांनी बंड करत ठाकरेंपासून फारकत घेतली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. बंड करण्यामागील कारणं सांगताना शिंदे गटातील आमदारांनी अजित पवारांकडे अंगुलिनिर्देश केले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होतेच, त्यासोबतच अर्थ खातंही अजित पवारांकडेच होतं. अशातच अजित पवारांनी निधीवाटपात भेदभाव केला असं कारणं बंडानंतर शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी दिलं होतं. अशातच आता अजित पवारही सरकारमध्ये सामील झाले आहेत. तसेच, अर्थ खात्यासाठी ते आग्रही आहेत. पण शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार, मंत्री यावरुन नाराज आहेत. एकीकडे अर्थखातं अजित पवारांकडेच जाणार असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे अर्थ खातं त्यांच्याकडे देण्यास शिंदे गटातील आमदारांचा विरोध आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार? खरंच खातेवाटपाचा तिढा सुटलाय की, तो आणखी लांबणीवर पडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भाजप हायकमांडच्या हस्तक्षेपानंतर खातेवाटपचा तिढा सुटला?
अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि अमित शाह यांच्यात काल (बुधवारी) दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजप हायकमांड मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार गटाकडून खाते वाटपाबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर जवळपास तिढा सुटला असल्याचं बोललं जात आहे. तसेच, अजित पवारांच्या 90 टक्के मागण्यांवर एकमत झालं असून तिनही पक्षांच्या सहमतीनं अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तिनही पक्षांमध्ये सहमती झाल्यास मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :