मुंबई: राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने श्आ( Ajit Pawar )ता शरद पवार ( Sharad Pawar ) गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. शरद पवार गटातील आमदारांनी पक्ष विरोधी कृत्य केल्यामुळे या आमदारांना आपत्र करण्यात यावं अशी मागणी करत अजित पवार गटाने विधीमंडळाच्या अध्यक्षांकडे याचिका दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


विधिमंडळ अध्यक्षांकडे अजित पवार गटाकडून पक्ष विरोधी कृत्य करणाऱ्या शरद पवार गटातील आमदारांना तत्काळ निलंबित करावं अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. मूळ राष्ट्रवादी ( NCP ) आपलीच असल्याचं सांगत अजित पवार गटाने ही मागणी केली आहे. 


आपणच मूळ राष्ट्रवादी असल्याचा दावा


राष्ट्रवादीतील अजित पवार गट हा दोन महिन्यापासून सत्तेत सामील झालेला आहे. त्यावर शरद पवार गटाने राष्ट्रवादीच्या ज्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे त्यांना निलंबित करावं अशी मागणी केली होती. पण अजित पवार गटाकडून अद्याप तशी कोणतीही मागणी करण्यात आली नव्हती. आता मात्र अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपली राष्ट्रवादी ही मूळ राष्ट्रवादी असून शरद पवार गटातील आमदारांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचं सांगितलं आहे. 


आज अजित पवार गटाने विधीमंडळाच्या याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये मूळ राष्ट्रवादी आपलीच असल्याचं सांगितलं आहे. अजित पवार गटाचे प्रतोद यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे यापुढेही अजित पवार गटाकडून आक्रमक भूमिका घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट आहे. 


अजित पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेनंतर आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


पक्ष आणि चिन्हाच्या वादावर 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी


राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद आता निवडणूक आयोगात पोहोचला असून त्याबाबत 6 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत ही सुनावणी पार पडणार आहे. 6 तारखेच्या सुनावणीत शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट आपली भूमिका निवडणूक आयोगासमोर मांडणार आहेत. 


यापूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजित पवार गटाने केलेले सर्व दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. शरद पवार गटाकडून पक्षात फूट पडली नसून शरद पवार हेच अध्यक्ष असल्याबाबत सांगण्यात आलं आहे.


ही बातमी वाचा: