नवी दिल्ली: संसदेच्या नव्या इमारतीची भव्य दिव्य इमारत पाहून अनेकांचे डोळे विस्फारले असतानाच, तिथं घडलेल्या एका प्रसंगामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. नवी दिल्लीतील नव्या संसद भवनात राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची भेट झाली. इतर खासदारांसोबत दोघे एकाच जेवणाच्या टेबलावरही पाहायला मिळाले. हे चित्र बघून जेवणाच्या टेबलवर काही राजकारण शिजलं का? अशी चर्चा रंगली आहे. 


एकत्र जेवले, एकत्र फोटोही काढला (Sharad Pawar Praful Patel Photo)


नवी दिल्लीत आज संसदेच्या नव्या इमारतीमध्ये पहिल्या दिवसाचं कामकाज चाललं. त्यानिमित्ताने देशभरातील खासदार एकत्रित आले होते. याचवेळी अवघ्या काहीच महिन्यांपूर्वी वेगळे झालेल्या अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला. एवढंच नाही तर जेवणाच्या टेबलवर काही खासदार एकत्रित बसले. त्यामध्येही प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांच्या शेजारीच बसलेले दिसतात. 


राजकीय चर्चांना फोडणी मिळाली (Praful Patel Meet Sharad Pawar )


वरवर दिसतेय ती राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट. पण ही फुट खरोखरच आहे का? की राजकीय सोईसाठी केलेली ही मिलीभगत आहे? राज्यातल्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना असा प्रश्न पडला असतानाच आता प्रफुल्ल पटेल यांनी शेअर केलेल्या फोटोमुळे त्याला फोडणी मिळाल्याचं दिसतंय. 


 






शिवसेनेने केलेली चूक राष्ट्रवादीने टाळली (Maharashtra Shivsena Split News)


एकीकडे शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाने जोरदार टीका करत एकमेकांचे वाभाडे काढले. काहीजणांनी तर टीकेची पातळी एवढी घसरवली की ही लढाई शेवटचीच आहे, यानंतर कधीही एकमेकांचं तोडंही बघायचं नाही असाच निश्चय केल्याचं दिसलं. पण त्याचवेळी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मात्र दोन्ही गटांकडून संयमी भूमिका घेण्यात आली. एकमेकांवर टीका जरी झाली असली तरी ती सौम्य पातळीवर करण्यात आली.


शरद पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचं सांगितलं आहे. दुसरीकडे अजित पवार आणि त्यांचे सहकारी भाजपसोबत सत्तेत सामील झाले. पक्षाचा आणि त्याच्या चिन्हाचा वाद जरी निवडणूक आयोगात गेला असला तरीही दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर जाहीर टीका करण्याचे टाळताना दिसतात. 


वरून विसंवाद... आतून संवाद 


राष्ट्रवादीतील दोन्ही गट वेगवेगळे आहेत असं वरून जरी दाखवण्याचा प्रयत्न असला तरीही आतून मात्र दोन्ही गटांमध्ये संवाद आहे हे नक्की. त्याचाच प्रत्यय पुण्यातील शरद पवार आणि अजित पवार (Sharad Pawar ajit Pawar Pune Meeting) यांच्या भेटीतून आला. त्यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या अधिवेशनाच्या काळात जयंत पाटील आणि सुनील तटकरेंनी एकमेकांना मिठी मारल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 


त्यामुळे नेत्यांची राजकीय भूमिका एक आणि दिसणारं चित्र वेगळंच असा काहीसा प्रकार राष्ट्रवादीसोबत घडतोय. शेवटी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोणती राजकीय समीकरणं जुळवतील आणि कोणता राजकीय डाव टाकतील याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही हेच खरं. 


ही बातमी वाचा :