Nashik Savarakar Gaurav Yatra : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या अवमानास्पद विधानाच्या विरोधात शिवसेना आणि भाजपने सावरकर गौरव यात्रा (Savarakar Gaurav Yatra) काढून प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला आहे. नाशिकमध्ये  (Nashik) भगूर या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गावापासून यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी वीर सावरकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. 


राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात वातावरण तापले आहे. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer sawarkar) योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी 30 मार्चपासून 6 एप्रिलपर्यंत राज्यातील 288 मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा काढण्याचा संकल्प भाजपा आणि शिवसेनेने सोडला आहे. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रविवारी सुटीच्या दिवशी विविध ठिकाणी मिळून 100 हून अधिक यात्रा काढण्यात आल्या. नाशिकमध्ये देखील भाजपच्या वतीने सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ झाला. भगूर (Bhagur) येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जन्मस्थान स्मारकात भाजपा पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजय चौधरी उपस्थित होते. भाजपच्या असंख्य मान्यवरांनी स्मारकात जाऊन प्रतिमा पूजन केले. 


नाशिक शहराच्या प्रमुख मार्गावरून गौरव यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. यावेळी भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर गौरव यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. ही यात्रा सिन्नर आणि इगतपुरी तालुक्याकडे मार्गस्थ झाली. राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी एकही अपशब्द काढला तर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा महामंत्री विजय चौधरी यांनी यावेळी दिला. 


आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभामध्ये सावरकर गौरव यात्रा होत आहे. या गौरव यात्रेचा प्रारंभ क्रांतीसुर्य सावरकर यांच्या सावरकर वाड्यातून होत असून मनस्वी आनंद होत असल्याची भावना महामंत्री विजय चौधरी यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेसकडून वारंवार होत असलेल्या अवमानकारक वक्तव्यांचा निषेध करण्यासह सर्वसामान्य जनतेला सावरकरांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी आयोजित ‘वीर सावरकर गौरव यात्रे’ला राज्यभरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. 


स्वातंत्र्यविरांचा अपमान हा देशाचा अपमान 


दरम्यान वीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर भाजप प्रवक्ते अजित चव्हाण म्हणाले कि, आज श्रीरामांच्या नगरीतून आणि वीर सावरकर यांच्या जन्मभूमीतून सावरकर गौराव यात्रा सुरु होत आहे. सावरकर गौरव यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात अजून चार दिवस प्रत्येक गावात, शहरात ही यात्रा निघेल. सावकरांचा इतिहास घराघरात पोहोचवला जाईल. स्वातंत्र्यविरांचा अपमान हा देशाचा अपमान असून सावरकरांचा त्याग, बलिदान विसरून चालणार नाही.