मालेगाव : मालेगाव कायमच धगधगणार दाट लोकवस्तीच शहर.. दारिद्रय, अस्वच्छता, बकालपणा,  नागरिकांचा असहकार, लोकप्रतिनिधीची अनास्था अशा एक ना अनेक समस्यांनी घेरलेले मालेगाव नेहमीच चर्चेत राहिले आहे.  याच मालेगावने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्य सरकारची झोप उडवली होती.  कोरोनाचा अचानक विस्फोट झाल्यानं  आरोग्य यंत्रणाही हादरून गेली होती. आरोग्य कर्मचारी, शेकडो पोलीस कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मिशन मालेगाव हाती घेतले. हळूहळू मालेगाव पूर्व पदावर आले. मात्र आता हेच मालेगाव कुतूहलाचा विषय ठरलंय. राज्यात सर्वत्र गुणकार पद्धतीने रुग्णसंख्या वाढत असताना मालेगावात सक्रिय रुग्णांची संख्या अवघी 55 आहे. त्यामुळे मालेगावच्या कोरोना मुक्तीचे रहस्य नेमके काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. 


कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल  मालेगाव आता शांत आहे. राज्यभरात रुग्ण संख्येचे आकडे हजारोने वाढत असताना मालेगावमध्ये मात्र बोटावर मोजण्याएवढेच रुग्ण आढळत आहेत. सरकारी नियमांचे सर्रास उल्लंघन होणाऱ्या मालेगावमध्ये रुग्ण संख्या वाढत नसल्याने सर्वांना आश्चर्य वाटतय. म्हणूनच मालेगावचा अभ्यास केला जातोय, अनुत्तरित प्रश्नांचा शोध घेतला जातोय. आरोग्य विज्ञान विद्यापिठाने यासाठी पुढाकार घेतला आहे.


पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान लष्करी जवानांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झालीय.  त्यामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून  मालेगाववर संशोधन होणार आहे. तोंडाला मास्क नाही, लसीकरणबाबत उत्साह नाही, सोशल डिस्टसिंग नाही. अंधश्रध्दाचा प्रचंड पगडा असतानाही रुग्णवाढ नसल्याने याची कारण शोधली जाणार आहेत अलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी  अशा सर्वच शाखांच्या  40 तज्ञांच्या टीमच्या माध्यमातून मालेगावमध्ये सर्वेक्षण केले जाणार आहे.  दोन ते अडीच हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहे. त्यांचा दिनक्रम, खाण्या पिण्याच्या सवयी, कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेतली जाणार आहे, त्याचा एक समग्र डाटा तयार करून मालेगावातून कोरोना का हद्दपार होतोय याची कारण शोधली जाणार आहे, यालाच मालेगाव मॅजिक हे नाव देण्यात आलंय.


विद्यापीठाच्या सर्व्हेक्षणाला लवकरच सुरवात होणार आहे.  त्या आधीच एबीपी माझाने मालेगावचे नागरीक धर्मगुरू यांच्यांशी संवाद साधत मालेगावची रुग्णसंख्या कमी का झाली याची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मालेगावच्या नागरिकांनी कोरोनाची भीती मनातून काढून टाकली, सर्दी खोकला असे लक्षण जरी आढळेल तरी घरच्या घरी उपचार केला जात आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा मांसाहार होत असल्याने इम्युनिटी प्रचंड वाढली आहे. इथले लहान मुलं कुठेही खेळतात, पॉवर लूम मुळे इथल्या नागरिकांचा श्वसनाचे विकार होतात मात्र त्याविरोधात लढण्यासाठी त्यांची प्रतिकार शक्ती वाढलेली आहे. कोरोनाच काय? पण आजवर अनेक साथीच्या आजारांना मालेगावच्या जनतेनं पळवून लावलंय. त्यामुळे सरकारी नियम, गोळ्या औषधापेक्षा इथल्या जनेतला अल्ला मौलाना मौलावीवर जास्त विश्वास आहे. दवा नाही पण दुवा कामी येतील ही त्यांची धारणा आहे, त्यामुळे टेस्ट होत असून ही बाधित रुग्णांची संख्या कमी असल्याचा दावा मालेगावकर करत आहेत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



इतर महत्त्वाच्या बातम्या :