वाशिम : वाशिमच्या कारंजा नगरपालिकेतील मुख्याधिकारी, नगराध्यक्षांमध्ये भर रस्त्यावर फ्री स्टाईल झाल्याची घटना घडली. कारंजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर आणि नगराध्यक्ष शेषराव ढोके यांच्यात शाब्दिक वादानंतर फ्री स्टाईल हाणामारी झाली. ही घटना काल 1 मार्च रोजी कारंजा शहरातील मंगरूळपीर रोडनजीकच्या एका पेट्रोलपंपासमोर सायंकाळी घडली.
मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर हे काही दिवस आजारी रजेवर होते. ते काल 1 मार्च रोजी रुजू झाले. कोरोनाच्या काळात जमावबंदीमुळे शहरातील सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची आहे. संध्याकाळी पाच ते सकाळी 9 वाजेपर्यंत संचार बंदी आहे. मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर 1 मार्च रोजी सायंकाळी आपले कर्तव्य बजावत असताना एका पेट्रोल पंपाजवळ रसवंती व एक हॉटेल व्यवसायिक हे दुकाने बंद करण्याची वेळ सायंकाळी 5 असतानासुद्धा सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू ठेवलेली त्यांना दिसली.
त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रकिया मुख्याधिकारी दादाराव दोल्हारकर व कोरोना पथक प्रमुख राहुल सावंत व कर्मचारी करीत असताना त्याठिकाणी नगराध्यक्ष शेषराव ढोके आले. ते म्हणाले की, श्रीमंतावर कारवाई न करता गरिबांवर कार्यवाही करू नका. असे म्हणून शासकीय कामात अडथळा निर्माण केला या कारणावरुन मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर आणि ढोके यांच्यात बाचाबाची झाली, तसेच ते एकमेकांच्या अंगावर देखील धावून गेले. यासंदर्भात एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
या वेळी कर्मचारी राहुल सावंत यांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र नगरअध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांचा कार्यालयीन वाद असल्याचं कळते. त्याचा उद्रेक रस्त्यावर झाला. त्यामुळे हे प्रकरण कोणते वळण घेते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.