Maharashtra Rain LIVE UPDATE : राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, पाहा प्रत्येक ठिकाणचे अपडेट्स
Maharashtra Rain Update : काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात गेल्या अर्ध्या तासापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनगराच्या सखल भागाच्या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवे हा सखल भाग असल्यामुळे अंधेरी सबवे येथे दीड ते दोन फूट पाणी साचल्यामुळं अंधेरी सबवे वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या मुंबई महानगरपालिका कर्मचारी आणि मुंबई पोलिसांचे जवान अंधेरी सबवेला बॅरिकेटिंगच्या माध्यमातून बंद केला आहे.
जालना जिल्ह्यात सर्वदूर पावसाने तुफान हजेरी लावली असून जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी तालुक्यात जोरदार पावसाने नद्यांना आणि ओढ्यांना पूर आलाय. घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांना पावसाचा मोठा तडाखा बसला असून बानेगाव या गावात पाणी शिरल्याने या गावचा संपर्क तुटलाय, तर दुसरी कडे अंबड बाजार समिती मध्ये पावसाच्या पाणी तुंबल्याने दुकानांनी पाणी शिरलंय, परिणामी व्यापाऱ्यांचा लाखो रुपयांचा माल यामुळे खराब झालाय..
परभणी जिल्ह्यात काल सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे काल रात्री व पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आलाय. त्यामुळे सहा गावांचा संपर्क तुटला असून तांदुळवाडी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे .लेंडी नदीला आलेल्या पुरात शेतकऱ्याची बैलजोडी वाहून गेल्याची घटनाही घडली आहे. दरम्यान अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा नदी नाले ओसंडून वाहण्यास सुरुवात झालीय..
नवी मुंबई -
नवी मुंबई , पनवेल मध्ये सकाळपासून रिमझिम पावसाच्या सरी ,
मुसळधार पाऊस पडत नसल्याने पाणी साचल्याची घटना नाही ,
शहरावर ढगाळ वातावरण
औरंगाबाद कन्नड घाटात दरड कोसळली, रात्री 2 वाजल्यापासून औरंगाबाद-धुळे महामार्ग बंद, वाहनांच्या रांगा, रात्री झालेल्या मोठ्या पावसाने कोसळली दरड
काहीकाळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे. २२ आॅगस्टनंतर पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला होता त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. त्यात आॅगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत नसल्यानं बळीराजावर संकट ओढवले होते. मात्र, महाराष्ट्रात सध्या सर्वत्र चांगला पाऊस कोसळतो आहे. मुंबईत देखील रात्रीपासून पावसाची संततधार बघायला मिळत आहे. पुढील २४ तास मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील ३-४ तास पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रत्नागिरी - काही ठिकाणी मुसळधार सर तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपच्या सरी जिल्ह्यात कोसळत आहेत. आज दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आता वातावरण ढगाळ असून आकाशात ढगाची दाटी दिसून येत आहे.
बुलढाणा - जिल्ह्यात अनेक ठिकाणी फक्त रिमझिम पाऊस. वातावरण ढगाळ.
नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही जागी संततधार पाऊस झालाय, संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून सध्या कुठेही पाऊस नाहीये.
हिंगोली शहरासह जिल्ह्यात रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस
दादर,सायन, माटुंगा आणि वांद्रे परिसरात रिमझिम पाऊस सुरू
रात्री सातारा शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. सध्या पाऊस नाही. ढगाळ वातावरण आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुढील 3-4 तास काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ,
ठाणे, पालघर जिल्ह्यावर दाट काळ्या ढगांची गर्दी
पार्श्वभूमी
Maharashtra Rain Update : काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे. 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला होता त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. त्यात ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत नसल्यानं बळीराजावर संकट ओढवले होते. मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला होता. त्याच महाराष्ट्रातील अनेक धरणांच्या पाणी पातळीत अपेक्षित अशी वाढ होत नसल्याचं बघायला मिळत नव्हतं. मात्र, आता छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानेतसेच पूर्व-पश्चिमेकडून दोन्ही दिशेने वारे वाहत असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकणात काय स्थिती असणार?
कोकणात 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडूनवर्तवण्यात आला आहे. उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचाअंदाज आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात साधारण 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात पावसाचा काय अंदाज?
मराठवाड्यात आज आणि उद्या सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात आज यलो अलर्ट जारीकरण्यात आला आहे. म्हणजे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतचा पाऊस हवामान विभागाकडून वर्तवण्यातआला आहे. तिकडे, लातूर आणि उस्मानाबादसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजे, ह्या दोन्ही जिल्ह्यात काहीठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात पावसाची काय परिस्थिती?
मध्य महाराष्ट्रात 31 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. ज्यात प्रामुख्याने उत्तर मध्य महाराष्ट्रातसर्वत्र पाऊस बघायला मिळू शकतो. उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे. ज्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतच्या पावसाचा अंदाज आहे. उद्या नाशिकसाठी मात्र आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यताआहे.
विदर्भात पाऊस-पाणी कसं असेल?
विदर्भात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण विदर्भासाठीआज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाण्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपुरमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -