Maharashtra News : राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या उत्तर सभेत शरद पवारांवर निशाणा साधताना बाबासाहेब पुरंदरेंवर होणाऱ्या टीकेचा उल्लेख केला होता. आणि ही टीका योग्यच असल्याचं प्रत्युत्तर शरद पवारांनी कालच्या पत्रकार परिषदेत दिलं. ही सर्व टीका सुरू झाली होती ती जेम्स लेनच्या पुस्तकावरून. जेम्स लेनला हे पुस्तक लिहीण्यात बाबासाहेब पुरंदरेंनी मदत केल्याचा आरोप आहे. मात्र आता यासंदर्भात मनसेनं बाबासाहेब पुरंदरे यांचं एक पत्र समोर आणत शरद पवारांची टीका खोडण्याचा प्रयत्न केला आहे. जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी आणणारं पत्र पुरंदरेंनी ऑक्सफर्ड प्रकाशनला लिहीलं होतं. आता तेच पत्र समोर आणत मनसेनं शरद पवारांना काही प्रश्न विचारले आहेत. 


मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे पत्र समोर आणलं आहे. संदीप देशांपांडे यांच्या दाव्यानुसार, 2003 साली स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी ऑक्स्फर्ड युनिवर्सिटी पब्लिकेशन्सला पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये बाबासाहेब पुरंदरेंनी जेम्स लेन यांनी लिहिलेल्या आणि त्यानंतर वाद निर्माण झालेल्या पुस्तकावर पब्लिकेशन हाऊसनं बंदी घालावी, अशी मागणी केली होती. या पत्रामध्ये पुरंदरे यांनी म्हटलंय की, जेम्स लेन यांनी लिहिलेल्या पुस्तकात लाखोंचं श्रद्धास्थान असलेल्या शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वादग्रस्त गोष्टी लिहिल्या होत्या. ज्यासंदर्भात कुठलेही पुरावे त्यांनी दिले नाहीत. आणि केवळ कपोलकल्पित गोष्टींवर आधारित अशी ही माहिती असून त्यामध्ये काहीच तथ्य नाही, असं त्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. 




 
संदीप देशपांडेंनी हे पत्र समोर आणत राष्ट्रवादीला काही प्रश्न विचारले आहेत. संदीप देशपांडे म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना हे पत्र माहिती नाही का? 2003 ला राज्यात सत्ता कुणाची होती? पवारांना माहिती असताना पुरंदरेंचा अपप्रचार का?" तसेच पुढे बोलताना राज्यात 1999 पासून जाती जातीत भांडणं झाली ते यासाठीच बोललं जातं, असं म्हणत संदीप देशपांडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 


दरम्यान, संदीप देशपांडेंनी समोर आणलेल्या या पत्राच्या खाली अनेक इतिहासतज्ञांनी सह्याही केल्या होत्या. यामध्ये जी. बी. मेहेंदळे, प्रदीप रावत, पांडुरंग बलकवडे, जयसिंगराव पवार यांसारख्या इतिहासतज्ञांनी सह्या या पत्राखाली आहे.