मुंबई : गरमीने हैराण झालेल्या जनतेसाठी मान्सून संदर्भात आनंदाची बातमी आहे. मान्सून वेळेआधीच केरळात धडकला आहे. त्यामुळे आता मुंबईत मान्सूनची प्रतिक्षा आहे. मुंबईतही येत्या काही दिवसात मान्सूनची चाहूल लागण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुढील 48 तासात मान्सून पूर्व पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी या भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
कधीही कर्नाटकात पोहोचू शकतो मान्सून
आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार, केरळमध्ये 30 मे रोजी दाखल झालेला मान्सून कधीही कर्नाटकात पोहोचू शकतो. साधारणपणे, कर्नाटकात 3 जूनपासून मान्सूनचा पाऊस सुरू होतो. मात्र यंदा 30 मे रोजीच मान्सून केरळमध्ये पोहोचला. त्याच वेळी, त्याचा वेग अजूनही वेगवान आहे. कर्नाटकसाठी जारी केलेल्या दैनिक हवामान अहवालात म्हटले आहे की, नैऋत्य मान्सून उर्वरित नैऋत्य अरबी समुद्र, पश्चिम-मध्य अरबी समुद्राचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्राचा बहुतांश भाग आणि लक्षद्वीप प्रदेश, केरळ आणि इतर भागांमध्ये प्रगती करत आहे. दक्षिण तामिळनाडू, मालदीव आणि कोमोरिन प्रदेशात काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे.
मुंबईत दोन दिवस पावसाचा यलो इशारा
मुंबईत सध्या काही भागात पारा कमालीचा वाढला आहे. मुंबईकरांना कडक उन्हापासून दिलासा मिळणार आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी जोरदार पावसाचा शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. आयएमडीने (IMD) मुंबई, ठाणे आणि रायगड या भागात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. यामुळे अरुणाचल, आसाम, मेघालय, सिक्कीम या भागात अतिवृष्टीचा इशारा आयएमडीने दिला आहे. याशिवाय अंदमान-निकोबार बेटे आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार?
मुंबईत 10-11 जूनच्या सुमारास मान्सूनचा पाऊस पडू शकतो. हवामान विभागाच्या माहितीनुसार, केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील काही दिवसांत साधारण 10 किंवा 11 जूनला मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनचा पहिला पाऊस मुंबई दाखल झाल्यानंतर येत्या 4 ते 5 दिवसात तो उर्वरित महाराष्ट्रात पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :