मुंबई :  राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)  29 जानेवारी, 30 जानेवारी,  5 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीला होणाऱ्या   परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आलीय.  गट ब दर्जाच्या  पदांसाठी   मुख्य परीक्षा होणार होत्या. 


मात्र या मुख्य परीक्षेआधी झालेल्या पूर्व परीक्षेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उत्तर पत्रिका तपासताना चूक झाल्याचा दावा काही विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. हा दावा करणाऱ्या 86 विद्यार्थ्यांकडून त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आयोगाने उत्तर पत्रिका तपासताना चूक केल्याने आपली मुख्य परीक्षा देण्याची संधी एक किंवा दोन गुणांनी हुकल्याचा या विद्यार्थ्यांचा दावा होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात परीक्षा देण्यास परवानगी देण्यात यावी असा निर्णय दिला होता.  त्यानंतर इतरही उमेदवारांनी त्यांनाही आयोगाच्या चुकीमुळे एक किंवा दोन कमी मिळाले आणि मुख्य परीक्षेची संधी हुकल्याचा  दावा करत न्यायालयात धाव घेतली होती.




पुण्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्यासाठी आंदोलन देखील करण्यात आले होते.  मात्र अचानकपणे मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास मर्यादित प्रमाणात असलेल्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांमुळे परीक्षा घेणं शक्य होणार नाही असं म्हणत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या परीक्षांची पुढची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.


यूपीएससीला जे जमतं ते एमपीएससीला का जमत नाही? वेगवेगळ्या डिफेन्सच्या परीक्षा होतात, त्या यंत्रणेला जमतं ते एमपीएससीला का जमत नाही? सरकार आणि एमपीएससी विद्यार्थ्यांच्या जीवाशी कुठपर्यंत खेळणार आहे?  विधानसभेत सांगून सुद्धा जर वचनाची पूर्तता होत नसेल तर त्या नेत्यांवर हक्कभंग नका आणू नये? हे सगळे प्रश्न आता रात्रीचा दिवस करुन एमपीएससीची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारे मुलं विचारत आहेत.