Polluted Cities : सध्या राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमधल्या प्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजतोय. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं. नवी दिल्लीतील लोकांचा वायू प्रदूषणाने श्वास रोखून धरलाय. मात्र, फक्त राजधानी दिल्लीच नव्हे तर भारतातील तब्बल 46 शहरांतील नागरिक देखील प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आता समोर आलं आहे. जगभरातील टॉप 100 प्रदुषित शहरांमध्ये भारतातील तब्बल 46 शहरांचा समावेश आहे. जगभरातील हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या IQAir ने प्रदुषित शहराची यादी जाहीर केली आहे. यामध्ये जगभरातील टॉप 100 प्रदुषित शहरांमध्ये भारतातील 46 शहरं, चीनमधील 42 शहरांचा समावेश आहे. तर पाकिस्तानमधील 6 आणि बांगलादेशमधील 4 शहरांचा समावेस आहे. इंडोनेशिया आणि थायलँड या देशातील प्रत्येकी एका शहरांचा या यादीत समावेश आहे. या सर्व शहरांतील PM2.5 एयर क्वालिटी रेटिंग 50 पेक्षा जास्त आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जगातील आघाडीच्या दहा प्रदुषित शहरांमध्ये भारतातील ९ शहरांचा समावेश आहे. चीनमधील होटान शहराची हवा जगभरात सर्वाअधिक विषारी राहिली आहे. या शहराचा PM2.5 रेटिंग 2020 मध्ये सरासरी 110.2 इतका राहिलाय.
भारत, चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील तब्बल 98 शहरांची हवा अधिक विषारी होत चालली आहे. यामध्ये भारतामधील 46 शहरांचा समावेश आहे. दिवाळीमध्ये दिल्लतील हवा सर्वाधिक प्रदुषित असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, दिल्लीप्रमाणेच इतर 45 शहरांची हवाही दुषित झाल्याचं चित्र निर्माण झालेय. काही ठिकाणाची हवा, राहण्यायोग्य नसल्याचेही बोललं जात आहे. प्रदुषणाच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकलं आहे. पुढील काही वर्षात ही परिस्थिती न बदलल्यास या शहरांमध्ये राहणं कठीण होणार आहे. श्वास गुदमरु शकतो. अनेकांना श्वसनाचे गंभीर आजार उद्भवू शकतात. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणं गरचेचं आहे.
गाझियाबादमधील हवा सर्वाधिक विषारी -
चीनचे होटानं शहर जगातील सर्वात प्रदुषित शहर राहिलेय. त्यानंतर भारतातील गाझियाबाद या शहराची हवा सर्वाधिक विषारी आहे. जगातील सर्वाधिक विषारी शहरात गाझियाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर बुलंदशहर, चौथ्या क्रमांकावर बिसरख जलालपुर, पाचव्या क्रमांकावर भिवाड़ी, सहाव्या क्रमांकावर नोएडा, सातव्या क्रमांकावर ग्रेटर नोएडा, आठव्या क्रमांकावर कानपूर, नवव्या क्रमांकावर लखनौ आणि दहाव्या स्थानावर दिल्लीचा क्रमांक लागतो. जगातील आघाडीच्या दहा शहरांत भारतातील नऊ शहरांचा समावेश आहे. गाझियाबादमधील हवा देशात सर्वाधिक विषारी असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालेय.
संशोधनात काय म्हटलेय?
मेडिकल जर्नल लान्सेटनं दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये वायू प्रदुषणामुळे देशभरात 16 लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. प्रदुषण पसरवणाऱ्या ईंनाच्या जागी गॅसचा वापर वाढल्यामुळे 1990 पासून घरातील वायू प्रदुषणाने होणाऱ्या मृत्यूची संख्या कमी झाली आहे. मात्र, वातावरणात पसरलेल्या प्रदुषण अधिक घातक आणि धोकादायक ठरत आहे. वाहने, उद्योग-व्यावसाय तसेच इतर कारणांमुळे होणाऱ्या प्रदुषणांमुळ हवा विषारी होत आहे. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचं दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या अंदाजानुसार, प्रत्येक वर्षाला वायू प्रदुषणामुळे जगभरात 70 लाख लोकांचा मृत्यू होता. वायू प्रदुषणामुळे व्यक्तीच्या मेंदू, डोळे,फुफ्फुसे आणि हृदयावर परिणाम होतो. त्यामुळे कॅन्सर आणि मधुमेह यासारख्या आजारांचा धोका बळावतो.
हवेची गुणवत्ता कशी तपासली जाते?
पार्टिकुलेट मॅटर (PM) 2.5, PM10, ओजोन, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि कार्बन मोनोक्साइडच्या स्तऱाच्या आधारावर हवेची गुणवत्ता तपासली जाते. पार्टिकुलेट मॅटर अत्यंत सूक्ष्म कण आहे, जो आरोग्याला हानी पोहचवतो. हवेत PM 2.5 आणि PM10 असणे अतिशय धोकादायक मानलं जाते.