Maharashtra Monsoon Updates : अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यानं अगदी हैराण केलं आहे. अशातच सर्वचजण पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. पण, राज्यात मात्र अद्यापही उष्णतेची लाट (Heat Wave) जाणवत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे तब्बल तीन दिवसांपासून मान्सून (Monsoon) कर्नाटकमधील (Karnataka) कारवारमध्येच रेंगाळला आहे. दरम्यान, राज्यात विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासह इतरही अनेक भागांत तापमान सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या राज्यातील बहुतांश नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाच्या चटक्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे.


अरबी समुद्राच्या बाजूने मान्सूननं 29 मे रोजीचं केरळात प्रवेश केला होता. त्यानंतर 31 मे रोजी मान्सून कर्नाटकच्या कारवापर्यंत पोहोचला. त्यानंतर गोव्यापासून काही अंतरावर असताना पोषक वातावरणामुळे तो केवळ दोन दिवसांत केरळमध्ये (Kerala) पोहोचेल, असं भाकीत हवामान विभागानं केलं होतं. पण अचानक हवामानात झालेल्या बदलामुळं नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मान्सून कर्नाटकच्या कारवारमध्येच रेंगाळला आहे. पण दुसरीकडे बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्यानं लगतच्या बहुतांश भागांत मान्सूननं प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालच्या काही शहरांसह, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागांत मान्सूननं धडक दिली आहे. याशिवाय, मेघालयमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्ययुक्त वाऱ्यांमुळे कर्नाटक, केरळ, लक्षद्विप, तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या काही भागातही पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


राज्यात उष्णतेची लाट


मान्सूननं बंगालच्या उपसागरातून लगतच्या भागांत प्रवेश केला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालसह लगतच्या राज्यांमध्ये पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. पण महाराष्ट्रात मात्र उष्णतेची लाट कायम आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या, उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भासह उत्तर भारतात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट असून ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. 


उत्तरेकडील राज्य आणि मध्य भारतात मात्र कमाल तापमानात वाढ होऊन काही भागात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. विदर्भात आणखी दोन दिवस तापमानाचा पारा अधिक असणार असून राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.