मुंबई: राज्याच्या विधीमंडळाचे बुधवारपासून अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सुरू होणार असून त्या निमित्ताने शिवसेनेतील ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे (Eknath Shinde) गट पुन्हा एकदा आमने-सामने येणार असल्याचं चित्र आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या विधानसभेच्या सर्व 55 आमदारांना पक्षादेश जारी करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाचे पक्षाप्रतोद सुनील प्रभू यांनी हा व्हिप जारी केला आहे. अधिवेशनाच्या संपूर्ण काळात दररोज कामकाज संपेपर्यंत सभागृहात उपस्थिती अनिवार्य असल्याचं या पक्षादेशात म्हटलं आहे. ठाकरे गटाच्या या व्हिपनंतर आता शिंदे गट काय भूमिका घेतोय हे पाहावं लागेल.  

Continues below advertisement


विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे. शिवसेनेचा पक्ष प्रतोद नेमका कोण याचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 


उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनात सरकारच्या वतीने अनेक विधेयकं मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे. यावेळी कदाचित मतदानाची वेळ येऊ शकते. त्यामुळेच ठाकरे गटाच्या वतीनं सुनील प्रभू यांनी हा व्हिप जारी केला आहे. इतर सर्व पक्षांनी त्यांच्या आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. 


राज्यातील सत्तासंघर्षावरच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून पुढची सुनावणी ही 22 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचवेळी शिंदे गटाने शिवसेना आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला असून तो वादही आता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आहे. सर्वोच्च न्यायालयात एकूण सहा याचिका दाखल असून यामध्ये पक्ष प्रतोद पदाचा वादाचाही विषय आहे. 


राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून म्हणजेच बुधवार 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. 17 ते 25  ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या दरम्यान तीन दिवसांच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळं अधिवेशनाचं प्रत्यक्ष कामकाज हे सहा दिवसांचं असणार आहे. 17  ते 25 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक 20,21  ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.