Maharashtra Monsoon Rain LIVE : अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनची जोरदार हजेरी, शेतीचं मोठं नुकसान
Maharashtra Monsoon Rain LIVE : मुंबई, उपनगर आणि परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बीडमधील मच्छिंद्रनाथ मुसळधार पाऊस झाला आहे. आष्टी आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर सावरगाव, मच्छिंद्रनाथ गड परिसरात शनिवारी मुसळधार पावसामुळे गर्भगिरी पर्वतरांगाखालील सर्व तलाव एकाच पावसात ओव्हरफलो झाले आहेत.
आष्टी तालुक्यामध्ये गेल्या वर्षीपासून वरूण राजाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत दुष्काळ मिटवून टाकला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही तालुक्यात मोठ्या पावसाची सुरुवात झाली आहे.
आष्टी तालुक्यामध्ये रोहिणी नक्षत्र कोरडे गेले. मात्र मृग नक्षत्र सुरू होऊन चार दिवस झाल्यानंतर तालुक्यातील इतर ठिकाणी रिमझिम पाऊस झाला आहे. तर मच्छिंद्रनाथ गड, सावरगाव शेडगेवाडी या परिसरामध्ये एकच पावसात सर्व तलाव तुडुंब भरले आहेत.
Aurangabad Rain Update: सलग तिसऱ्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडत आहे. चापानेर, महालगांव, कन्नड, आधानेर या ठिकाणी पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहे.
Kolhapur Rain : कोल्हापूरच्या पन्हाळा गडावर पावसानं दमदार हजेरी लावली आहे. जिओ ग्रेड पद्धतीनं नवीन बांधलेल्या रस्त्यावरुन पाणी नेबापूरमध्ये गेलं आहे. गतवर्षी आलेल्या महापुरात पन्हाळा गडावरील हाच रस्ता खचला होता. आज आलेल्या पावसाने नेबापूरमधील घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
Jalgaon Rain : जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यात काल आणि परवा झालेल्या वादळी वारा आणि पावसानं पंधरा घरे कोसळली आहेत. तसेच यामध्ये एका गाईचा मृत्यू झाला आहे. तर पन्नासहून अधिक शेतकऱ्यांचे बांध फुटून त्यांच्या कापूस पिकाचा आणि शेतीचा कस वाहून गेल्याचे समोर आलं आहे.
Ahmednagar Rain : अहमदनगर जिल्ह्यात मान्सूननं जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगाव आणि नगर तालुक्यात झालेल्या पावसानं शेतीचे मोठे नुकसान झालं आहे. जेऊर, ससेवाडी, बहिरवाडी, इमामपूर परिसरांत जोरदार पाऊस झाल्याने सर्व बंधारे तुडुंब भरलेत. शेतकऱ्यांचे बांध मोठ्या प्रमाणात फुटले असून अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीत आहेत. तर रस्त्याच्या बाजूला असलेले बोर्ड देखील वाऱ्याने पडलेत.
Yawatmal Rain : यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील दिघी, गळव्हा परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. पावसाच्या रौद्र रुपाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जोरदार पाऊस आणि वाऱ्यानं रस्तायवर उभी केलेली वाहनं देकील पडली आहेत. रस्त्यावरचे फलक तुटून पडले आहे.
Rain News : शनिवारी मराठवाड्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला. औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र याचवेळी निसर्गाची अवकृपा सुद्धा पाहायला मिळाली.अंगावर वीज पडून जालना जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला तर, दोन जण जखमी झाले. औरंगाबाद जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असून, नांदेड जिल्ह्यात एक जण जखमी झाला.
राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी विजेचं खांब देखील कोसळले आहे. दम्यान, पुढील पाच दिवसात राज्याच्या विविध भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढच्या 24 तासात कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
Yawatmal Rain : उमरखेड तुलुक्यातील नारळी गावामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने नारळी गावातील नागरिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसासोबत झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे लाईनचे पोल पडले. तसेच आनेक नागरिकांच्या घरावरील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे टीन पत्रे उडाले. वादळी वाऱ्यामुळे झाडे सुद्धा कोसळून पडली. या पावसामुळं नारळी गावाच्या नागरिकांचे खूप प्रमाणात नुकसान झाले.
Chandrapur Rain : शेतात काम करीत असताना वादळी वाऱ्यासह वीज पडून एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर 5 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. वरोरा तालुक्यातील दिंदोडा शेत शिवारात ही घटना घडली. सोहम हरिदास काळे (20) असे मृताचे नाव आहे. दुपारच्या दरम्यान वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झाला जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्व मजुरांनी शेतात असलेल्या एका झाडाखाली आश्रय घेतला. त्याच दरम्यान वीज पडून अपघात झाला. जखमींना तातडीनं वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अकोला शहरातील एमआयडीसी भागातील फेज क्रमांक तीनमधील अमरिश दालमिल परिसरात विज पडली. यामध्ये आठ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
Akola Rain : अकोल्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं दक्षिण मध्य रेल्वेच्या शिवापूर स्थानकावर लाखो रुपयांचं सिमेंट आणि खतांची पोती भिजलीत. यामध्ये व्यापाऱ्यांचे 30 ते 40 लाखांचं नुकसान झालं आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Monsoon Rain LIVE : सर्वांना प्रतिक्षा असलेला मान्सून अखेर मुंबईत दाखल झाला आहे. हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, मुंबई, उपनगर आणि परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, परभणी, औरंगाबाद, अहमदनगर, जालना या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण या पवसामुळं शेतकरी आता खरीपाच्या पेरणीच्या तयारीला लागणार आहेत.
राज्यातील शेतकरी पावसाची वाट बघत होते. अखेर राज्यातील बहुतांश भागात पावसाचं आगमन झालं आहे. त्यामुळं शेतीकामांना वेग आला आहे. पावसाअभावी शेतीची काम खोळंबली होती, त्या कामांना आता वेग आला आला आहे. दरम्यान, 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.
दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी पेरणीची गाई करु नये
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस जरी होत असला तरीसुद्धा 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय कुठेही शेतकर्यांनी पेरणी करु नये. पेरणीची घाई करु नये असे मत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तथा व्यवस्थापन तज्ञ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे गजानन गडदे व्यक्त केलं आहे. जोपर्यंत शेतामध्ये तीन ते चार इंच ओल निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करणे हे धोकादायक ठरु शकते. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येऊ शकतं जे आज परवडणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी आत्ताच पेरणीची घाई करु नये असे आवाहन गजानन गडदे यांनी केलं आहे.
पेरणी करताना नेमकी काय काळजी घ्याल?
पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतातील जमिनीची ओल तपासावी. ती ओल जर एक वीतभर गेली असेल तर पेरणी करण्यास काही हरकत नसल्याचा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे. वितभर ओल गेल्यास पेरणी करायला काही अडचण नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकासन होणार नसल्याचे डख म्हणाले. बियाणे चांगले वापरा, विद्यापीठानं सांगितलेलं बियाणे वापरा असा सल्लाही डख यांनी दिला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -