Maharashtra Weather Updates: मुंबई : अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या झळांपासून आता लवकरच दिलासा मिळणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे, मान्सून भारतात दाखल झाला आहे. मान्सूनचं (Monsoon Latest Updates) केरळ (Kerala News) आणि ईशान्य भारतात एकाच वेळी आगमन झालं आहे. 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होणार आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात 10 जूनपासून मान्सूनला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकण्यासाठी परिस्थितीही अनुकूल होत आहे. यामध्ये दक्षिण अरबी समुद्राचे अधिक भाग, मालदीवचे उर्वरित भाग आणि कोमोरिन क्षेत्रासह लक्षद्वीप परिसर आणि मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागराचा समावेश असणार आहे.
एकीकडे मान्सूनचं आगमन झाल्याचं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे राज्यभरात उष्मतेनं कहर केला आहे. अनेक भागांत तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत उष्णतेपासून दिलासा कधी मिळेल, याचीच वाट आज राज्यभरातील प्रत्येक नागरिक पाहत आहे. भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून (Monsoon 2024) केरळमध्ये दाखल झाला आहे आणि तो पुढे हळूहळू ईशान्य भारताच्या बहुतांश भागांत पुढे सरकेल, असं सांगितलं जात आहे.
केरळमध्ये पोहोचल्यानंतर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. याचा अर्थ त्या कालावधीत मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांचा समावेश असेल.
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, "मुंबईत उन्हाळ्यात तापमान सामान्यतः 35 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहतं, जे तसं पाहिलं तर सामान्य मानलं जातं. अशातच, 80 टक्के ते 90 टक्क्यांपर्यंत उच्च आर्द्रता पातळीमुळे, 35 -36 अंश सेल्सिअस तापमानातही 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान जाणवू शकतं.
येणाऱ्या काळात वातावरण कसं राहिल?
IMD च्या पुढच्या सात दिवसांच्या अंदाजानुसार, या आठवड्यात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. उदासीन परिस्थिती कायम राहील. गुरुवारी किमान तापमान 28 अंश सेल्सिअस, तर शुक्रवार आणि शनिवारी तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. पुढील आठवड्यात रविवार ते मंगळवारपर्यंत तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता असून ते 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मान्सून जवळ येत असताना, शहरात ढगाळ किंवा अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तापमानात 4-5 अंश सेल्सिअसने लक्षणीय घट होईल.