Maharashtra MLC Election Updates: विधानपरिषदेच्या पाच जागांचे निकाल काल लागले. कोकण शिक्षक मतदारसंघात कोकण शिक्षक मतदार संघात भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापचे विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांचा पराभव केला. तर उमेदवार निवडीबाबत महाविकास आघाडीत शेवटपर्यंत गोंधळ होऊनही महाविकास आघाडी पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांनी विजय मिळवत भाजपाला त्यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार धक्का दिला आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपाचे डॉ. रणजित पाटील व महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यात धीरज लिंगाडे यांनी बाजी मारली. इकडे मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विक्रम काळे चौथ्यांदा निवडून आले, मात्र त्यांना ही निवडणूक म्हणावी तशी सोपी गेली नाही. पाच मतदारसंघात नेमकं काय घडलं याचं समर्पक विश्लेषण...


नागपूर शिक्षक : भाजपाला पुन्हा शिकवला धडा !


उमेदवार निवडीबाबत महाविकास आघाडीत शेवटपर्यंत गोंधळ होऊनही महाविकास आघाडी पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांनी विजय मिळवत भाजपाला त्यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार धक्का दिला आहे. नागपूर पदवीधरच्या निवडणुकीतही भाजपाने यावेळी प्रथमच पराभवाची चव चाखली होती. त्याचीच पुनरावृत्ती झाल्याने भाजपाच्या विदर्भातील वर्चस्वाला ओहटी लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. ना गो गाणार हे दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिल्याने भाजपात नाराजी होती. पदवीधर प्रमाणेच ओबीसींची नाराजी यावेळीही दिसली. जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दाही या निवडणुकीत महत्वाचा ठरला आहे. आघाडीत सुरुवातीला गोंधळ झाला तरी नंतर मात्र सर्व नेत्यांनी एकदिलाने काम केलेले दिसले. आघाडीतील जागावाटपानुसार काँग्रेस नाशिकची व शिवसेना नागपूरची जागा लढवणार होती. पण काँग्रेसमध्ये तांबे पितापुत्राच्या बंडखोरीमुळे पेच निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने शुभांगी पाटील यांना पाठींबा दिला व नागपूरची जागा कॉंग्रेसला मिळाली होती.


कोकण शिक्षक : नव्या समीकरणाचा भाजपाला फायदा


कोकण शिक्षक मतदार संघात भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापचे विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांचा पराभव केला. मागच्यावेळी भाजपप्रणीत शिक्षक परिषदेत झालेल्या बंडखोरीचा व शिवसेनेने केलेल्या मतविभागणीचा बाळाराम पाटील यांना फायदा मिळाला होता. राज्यात तयार झालेल्या नव्या राजकीय समीकरणाचा भाजपाला कोकण शिक्षक मतदारसंघात काही प्रमाणात फायदा झाला. भाजप आणि शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांनी युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारासाठी मेळावाही घेतला होता. स्वतःमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, आदी नेते यासाठी उपस्थित होते. ही निवडणूक शिंदे-भाजप युतीने प्रतिष्ठेची केली होती.


अमरावतीत चुरशीची लढत, पण भाजपचा पराभव


अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपाचे डॉ. रणजित पाटील व महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यात धीरज लिंगाडे यांनी बाजी मारली. विधानपरिषदेतील अत्यंत अभ्यासू आमदार व अनुशेष व स्वतंत्र विदर्भाच्या लढ्याचे खंदे शिलेदार बी टी देशमुख यांनी सलग पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. माजी राज्यमंत्री रणजित पाटील यांनी 2010 साली त्यांचा पराभव केला. तेव्हापासून तेच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, तिसर्‍यांदा निवडणूक लढवली. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. धीरज लिंगाडे यांनी यावेळी त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आणि रणजित पाटील यांना पराभूत करत मैदान मारले.   मतदानाच्या दोन दिवस आधी लिंगाडे यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल केलेल्या आरोपांची एक एक ऑडिओ क्लिप बाहेर आल्याने खळबळ उडाली होती.  लिंगाडे यांची उमेदवारी जाहीर करण्यास झालेला विलंब, आघाडीतील रस्सीखेच यामुळे रणजित पाटील यांच्या प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या तेव्हा लिंगाडे यांनी प्रचार सुरू केला होता. परंतु नागपूरप्रमाणेच अमरावतीमध्येही भाजपला निवडणूक अतिशय कठीण गेली आणि हातची जागा गमावली.


मराठवाडा शिक्षक: आघाडीचा 'विक्रम'..पण यावेळी दमछाक !


मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विक्रम काळे सहज निवडून येतील असे अंदाज व्यक्त केले जात होते. ते चौथ्यांदा निवडून आले देखील. मात्र त्यांना ही निवडणूक म्हणावी तशी सोपी गेली नाही. भाजपा उमेदवार किरण पाटील यांच्याशी त्यांची प्रमुख लढत होती. पण अपक्ष उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांनी अनपेक्षित मुसंडी मारत आव्हान उभं केलं. अखेर उशिरापर्यंत चाललेल्या मतमोजणीनंतर विक्रम काळे यांनी चौथ्यांदा विधानपरिषदेत जाण्यावर शिक्कामोर्तब केला.  विक्रम काळे 2010 पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यापूर्वी त्यांचे वडील कै. वसंत काळे यांनी तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.


नाशिक पदवीधर: तांबे जिंकले पण... 


नाशिक पदवीधर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला. काँग्रेसने घातलेल्या गोंधळामुळे ही निवडणूक गाजली. विद्यमान आमदार डॉ सुधीर तांबे यांनी आपल्याला यावेळी निवडणूक लढवायची नाहीय, त्याऐवजी आपले चिरंजीव व युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांना उमेदवारी द्यावी अशी इच्छा पक्ष नेतृत्वाकडे व्यक्त केली होती. तरीही काँग्रेसने त्यांनाच उमेदवारी दिली. त्यांनी अर्ज भरलाच नाही. सत्यजित यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवून काँग्रेसने पिता-पुत्रांना पक्षातून काढून टाकले. सत्यजित हे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. मुलीचे नेतृत्व पुढे आणण्यासाठी मामाने भाच्याचा पत्ता कापला, की भाच्याने मामाची पंचाईत केली, की दोघांनी मिळून काँग्रेसला 'मामा' बनवले याबद्दल वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत. पण काँग्रेसने गमावलेले भाजपने कमावले. भाजपाने येथे आपला उमेदवार न देता सत्यजित तांबेंना मदत केली. हा गोंधळ सुरू असताना काँग्रेसला सुटलेल्या या जागेवर शिवसेनेनेने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठींबा जाहीर केला. त्यामुळे नागपूरची शिवसेनेला सुटलेली जागा काँग्रेसला मिळाली व ती निवडूनही आली. काँग्रेसची एक जागा कायम राहिली, पण एक तरुण नेता भाजपाकडे ढकलला गेल्याची चर्चा आहे.