Nagpur Cyber Attack News : सैन्यासाठी स्फोटक आणि 'मल्टिमोड ग्रेनेड्स' तयार करण्यात देशातील आघाडीची स्फोटके उत्पादक कंपनी असलेल्या नागपुरातील सोलर समुहावर सायबर हल्ला झाल्याने सुरक्षायंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार झाल्यावर 'हॅकर्स'ने 'ब्लॅक मार्केट'मध्ये संबंधित 'डेटा'साठी 'बिड' केली. ग्राहक मिळवण्यासाठी हॅकर्सकडून डार्क वेबचा वापर करण्यात येत असल्याचीही माहिती आहे. तसेच सोलर ग्रुपला खंडणीसाठी 'ई-मेल' आला होता. मात्र आणखी धोका नको म्हणून त्या मेलला 'क्लिक' करण्याचे देखील टाळण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय यंत्रणांचे अधिकारी नागपुरात पोहोचले आहेत.

सोलर ग्रुपवर मागील आठवड्यात हा सायबर हल्ला झाला. हॅकर्सने त्यात कंपनीचा महत्त्वाचा डेटा चोरला. त्यात कंपनीच्या माहितीसह संरक्षणविषयक माहिती आणि ड्रॉईंग्जचा समावेश होता. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना सूचना दिली आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन याचा तपास सुरु केला आहे. ब्लॅक कॅट नावाच्या हॅकर्स ग्रुपकडून हा हल्ला करण्यात आला आहे. 2 टीबीपेक्षा जास्त डेटा चोरीस गेला आहे. सोलरच्या तज्ज्ञांनी यातील काही डेटा परत मिळवण्यात यश मिळवले आहे.

'डार्क वेब'वर चोरलेल्या डेटाचे स्क्रीनशॉर्ट

यासंदर्भात तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्या विविध संकेतस्थळांवर आठवडाभराअगोदरच माहिती अपलोड झाली होती. यात सोलर ग्रुपवर नेमका कसा हल्ला झाला, त्यात कोणत्या डेटाची चोरी झाली, याची सविस्तर माहिती आहे. हॅकर्सने डेटा विकण्यासाठी मार्केटमध्ये बिड केली. लोकांचा विश्वास पटावा यासाठी त्यांनी लिक केलेल्या कागदपत्रांचे काही स्क्रीनशॉटस देखील अपलोड केली.

काय चोरलयं हॅकर्सने?

चोरीस गेलेल्या डेटामध्ये नेमकी किती संवेदनशील माहिती होती, याची माहिती अद्याप सोलर ग्रुपकडून देण्यात आलेली नाही. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात कंपनीचे अधिकारी-कर्मचारी आणि ग्राहकांची विस्तृत माहिती, शस्त्रास्त्रांचे ब्लूप्रिट्स, कंपनीच्या उत्पादनांचे दस्तावेज, प्रोडक्ट टेस्टिंगची दस्तावेज, भविष्यातील उत्पादनांची माहिती, सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग्ज, बॅकअप्स इत्यादींचा समावेश होता.

'डेटा परत हवा तर लिंकवर क्लिक करा'

यासंदर्भात सोलर ग्रुपकडून कुठलीही अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही. हा हल्ला झाल्यावर कंपनीला तीन ई-मेल आले. त्यात काही लिंक होत्या. चोरीस केलेला डेटा परत हवा असेल तर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर कोणत्या स्वरूपात तडजोड करु, याबाबत सांगण्यात येणार असल्याचे हॅकर्सने त्यात नमूद केले. मात्र त्यावर 'क्लिक' करण्यात आले नाही.

ही बातमी देखील वाचा...

Nagpur Politics : नागपुरात 'पदवीधरच्या' बदल्यात 'शिक्षक', भाजपमध्ये हिशोब बरोबर झाल्याची चर्चा!