Maharashtra MLC Election : राज्यात आज (2 फेब्रुवारी) विधानपरिषदेच्या पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. त्यापैकी पहिला निकाल कोकणातून आला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात (Konkan Teacher Constituency Election) भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांचा विजय झाला. त्यांनी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील (Balaram Patil) यांचा पराभव केला. या निकालात ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20683 मतं मिळाली तर बाळाराम पाटील यांना 10997 मतं मिळाली. सोबतच आश्चर्याची बाब म्हणजे या मतमोजणीत दीड हजारांहून अधिक मतं अवैध ठरली. त्यामुळे शिक्षकांना मतदान करता येत नाही का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.


🔴 कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक अपडेट
एकूण मतदान -  35069 
➡️ वैध मते 33450
➡️ अवैध मते - 1619
➡️ कोटा - 16726


➡️ ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे - 20683
➡️ धनाजी नानासाहेब पाटील - 1490
➡️ उस्मान इब्राहिम रोहेकर - 75
➡️ तुषार वसंतराव भालेराव - 90
➡️ रमेश नामदेव देवरुखकर - 36
➡️ बाळाराम दत्तात्रेय पाटील - 10997
➡️ राजेश संभाजी सोनवणे - 63
➡️ संतोष मोतीराम डामसे -  16


कोकण शिक्षक मतदारसंघात 1619 मते अवैध


कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे आणि बाळाराम पाटील यांच्यात थेट सामना होता. परंतु हा सामना एकतर्फी ठरला आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा मोठा विजय झाला. विजयासाठी आवश्यक 16 हजार मतांचा कोटा त्यांनी पहिल्याच फेरीत पूर्ण केला. पहिल्या फेरीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांना तब्बल 20 हजार 683 मते मिळाली. तर बाळाराम पाटील यांना 10997 मते मिळाली. धक्कादायक गोष्ट  म्हणजे या निवडणुकीत एकूण 1619 मते अवैध ठरली आहेत. 


ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांना मतदान करता येत नाही? 


कोकणातील निवडणूक ही शिक्षक मतदारसंघाची होती. म्हणजेच या निवडणुकीत मतदान करणारे मतदार हे शिक्षक होते. मतदार हे केवळ सुशिक्षित नाही तर शिक्षक देखील आहेत, असं असूनही या निवडणुकीत तब्बल 1619 मतं अवैध ठरली आहेत. विधानपरिषदेची निवडणूक ही विधानसभा निवडणुकीसारखी नसते. 


विधान परिषद निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान करायचं असतं. अनेक जाणकारांनाही वेळोवेळी नियमांचा आधार घ्यावा लागतो. पसंतीक्रमाची मतदानप्रक्रिया काहीशी किचकट असते. त्यामुळे मतदान करताना गोंधळ होऊ शकतो. एकवेळ कमी शिकलेल्या मतदारांकडून असा गोंधळ किंवा चुका अपेक्षित असतात. इतकंच काय तर एखाद दुसऱ्या शिक्षकांकडून अशा चुका होऊ शकतात असंही मान्य करता येईल. परंतु ज्ञानदानाचं काम करणारे, पुढची पिढी घडवणाऱ्या तब्बल 1619 शिक्षकांकडूनच मतदानाच्या वेळी झालेल्या चुका आणि त्यामुळे अवैध ठरलेली मतं यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. सोबतच अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत.


'या' कारणांमुळे मते अवैध ठरली? 


कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत 1619 मतं अवैध ठरण्याची कारणं वेगवेगळी आहेत. मतपत्रिकांमध्ये पसंतीच्या उमेदवारासमोर 1, 2 असे इंग्रजीत अंक लिहायचे असताना काही मतदारांनी फुली (X), गोल (O), किंवा आणखी काही लिहिलं आहे. तर काही मतदारांनी कोणालाच मत न देण्याचा ठरवत मतपत्रिका कोरी ठेवली आहे. अशा विविध कारणांमुळे या मतपत्रिका बाद ठरली आहे. परिणामी या निवडणुकी अवैध मतांची संख्या तब्बल 1619 एवढी ठरली.


शिक्षकांकडून मतदानाच्या वेळी झालेल्या चुकांमुळे तब्बल दीड हजारांहून अधिक मतं अवैध ठरली. शिक्षक ज्ञानदान करतात, पुढची पिढी घडवतात, पर्यायाने समाज घडवण्याची मोठी जबाबदारी ही शिक्षकांची असते. परंतु निवडणुकीत अवैध ठरलेल्या मतांची संख्या पाहता हे शिक्षक विद्यार्थ्यांना कसं शिकवत असतील, कसा आदर्श ठेवत असतील, असंही विचारलं जात आहे.


औरंगाबादमध्ये शिक्षकांचा मतपत्रिकेतून रोष, 2 हजारांहून अधिक मतं बाद


खाडाखोड करणे किंवा योग्य पद्धतीने पसंतीच्या उमेदवारासमोर खूण न करणे, किंवा काहीतरी मजकूर लिहिणे यामुळे अनेक मतपत्रिका बाद होतात. त्यामुळे शिक्षकांना मतदान करता येत नाही का असा प्रश्न विचारला जातो. परंतु त्याचवेळी मतपत्रिका बाद होण्याची कारणं वेगळी असू शकतात. याचं कारण म्हणजे औरंगाबाद विभागातील शिक्षक मतदारसंघातील आठ जिल्ह्यातील मिळून 61 हजारांपेक्षा जास्त मतदान झालं होतं. त्यापैकी तब्बल दोन हजारांहून अधिक मतं अवैध ठरली आहेत. जुन्या पेंशन योजनेवरुन शिक्षकांनी थेट मतपत्रिकेतून आपला रोष व्यक्त केला आहे. बाद झालेल्या किंवा अवैध ठरलेल्या अनेक मतपत्रिकांवर निषेधाचे मजकूर लिहिलेले दिसतात. 'नो पेंशन नो वोट', 'जुनी पेंशन द्या' असे मजकूर या मतपत्रकांवर लिहिलेले दिसतात. 


शिक्षक मतदारसंघासाठी कोण मतदान करु शकतं?


शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत माध्यमिक-सेंट्रल स्कूल, डिग्री कॉलेज, मेडीकल कॉलेज, पॉलिटेक्निक आणि इंजिनियरिंग कॉलेजचे शिक्षक मतदान करु शकतात. कमीत कमी तीन वर्ष शिकवण्याचा अनुभव असलेलेच मतदान करू शकतात. निवृत्त झालेले शिक्षकही निवृत्तीनंतर तीन वर्षापर्यंत मतदान करु शकतात.


संबंधित बातमी


Maharashtra MLC Election : पहिला निकाल हाती, कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी