मुंबई : 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या  गीताचं दुसरं आणि तिसरं कडवं राज्य गीत म्हणून गायलं जाणार आहे.  वेळेचा विचार करता गीत मोठं होत असल्यानं निर्णय घेण्यात आला आहे.  मंत्रालयाच्या समोर राज्य गीताचा बोर्डही लावण्यात येणार आहे.  एक मिनिट 45 सेकंदाचे हे राज्य गीत असणार आहेत.  


'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या मराठी माणसांच्या अभिमानगीताला आता महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुधीर मुनगंटीवार यांच्या सांस्कृतिक कार्य विभागानं जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्रगीताला राज्यगीताचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून 19 फेब्रुवारीपासून हा निर्णय अंमलात येणार आहे.


देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याला एक गीत असावं, असा ठराव करण्यात आला होता. त्यासाठी महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड झाली. राष्ट्रगीतानंतर आता राज्यात हे राज्यगीत गाण्यात येणार आहे. 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' याचे गीतकार राजा बढे आहेत. तर गायक शाहीर साबळे असून संगीतकार श्रीनिवास खळे आहेत. प्रेरणागीत, स्फूर्तीगीत म्हणून या गाण्याची ओळख असून मागील अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्राला या गाण्याने वेड लावले आहे. 


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा 
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥


भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥


काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥


1 मे  1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले, त्यावेळी मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्क येथे झालेल्या समारंभात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गाणे गायले होते. कार्यक्रमांच्या सुरुवातीला हे गाणे गायले जाईल आणि राष्ट्रगीताने संबंधित कार्यक्रमाची सांगता होईल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :