Nitin Gadkari : बुलढाणा (Buldana) जिल्ह्यात राबवलेल्या उपक्रमातून मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले. यामुळं मोठ्या प्रमाणात जमिनीत पाणी मुरलं असून, हा 'बुलढाणा पॅटर्न' (Buldhana pattern) देशात गेला असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी केलं. गडकरी हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी आपल्या आते-बहिणीकडं सांत्वनपर भेट दिली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अजूनही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची गरज असल्याचेही गडकरी यावेळी म्हणाले.


अजूनही पाणी जमिनीत जिरण्याकरता मोठे प्रयत्न होण्याची गरज 


बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा-अजिंठा या मार्गावर मोठ्या प्रमाणावर हिरवळ निर्माण झाली आहे. जमिनीमध्ये मुरलेल्या पाण्यामुळं येथील धनगर बांधवांना स्थलांतर करण्याची यंदा गरज पडली नाही. मात्र, अजूनही पाणी जमिनीत जिरण्याकरता मोठे प्रयत्न होण्याची गरज असल्याचे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. अजूनही येताना बराचश्या भागामध्ये पाहिजे त्या प्रमाणात काम झालं नसल्याची खंतही नितीन गडकरींनी बोलून दाखवली.


चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावलं पाहिजे 


बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वर्धा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अनेक ठिकाणी कोरडवाहू जमिन आहे. त्या ठिकाणी पाणी पोहोचलेलं नाही. जर धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकवलं, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावलं आणि थांबलेलं पाणी जमिनीत मुरवलं पाण्याच्या पातळीत वाढ होईल असे नितीन गडकरी म्हणाले. भारत सरकारची सोलर पंपाची योजना आहे. त्यामुळं सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत शेतीला पाणी मिळाले तर या भागात मोठ्या प्रमाणात बागायती शेती होई शकते असे गडकरी म्हणाले. 


 नदी, नाल्यांचे खोलीकरण रुंदीकरण करण्याची गरज 


मोठ्या प्रमाणात नदी, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याची गरज असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. तलाव, धरणांमधील माती काढणं, ती माती रस्त्यांसाठी वापरणं. कुठलाही पैसा न करत पाण्याची बचत करण्याचा कार्यक्रम अग्रक्रमाणे बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात केला पाहिजे असे गडकरी म्हणाले.  बुलढाणा ते अजिंठा या रस्त्यावर 15 हजार धनगर समाजाची लोकं स्थलांतरीत करत होती. पण पाण्याची पातळी वाढल्यामुळं त्या लोकांचे स्थलांतर थांबले. लोकं आता तिथे दोन दोन पीक घेत असल्याचे गडकरी म्हणाले. बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वर्धा जिल्ह्यात जर पाणी व्यवस्थापणाचे काम झाले तर येथील एकही शेतकरी आत्महत्या करणार नसल्याचे गडकरी म्हणाले. 


एनजीओ आणि राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा 


केंद्र सरकारच्या माध्यमातून देशात आत्तापर्यंत 1 हजार अमृत सरोवर बांधली आहेत. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 36 तलाव बांधल्याचे गडकरी म्हणाले. जिथे पाण्याची कमी आहे तिथे सरकारच्या माध्यमातून कामं सुरु असल्याचे गडकरींनी सांगितले. पाणी पातळी वाढवण्यासाठी वृक्षारोपण करण काळाची गरज असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, एनजीओ आणि राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असे गडकरी म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Nitin Gadkari : तो दिवस दूर नाही, ज्या दिवशी लोक ड्रोनमध्ये बसून विमानतळावर जातील - नितीन गडकरी