Congress Session Raipur : आजपासून छत्तीसगडमधील रायपूरमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनाला (Congress Session Raipur) सुरुवात होणार आहे. हे तीन दिवसांचे राष्ट्रीय अधिवेशन असणार आहे. आज सकाळी 10 वाजता काँग्रेस सुकाणू समितीची (Congress Steering Committee) बैठक होणार आहे. दरम्यान, या तीन दिवसांच्या अधिवेशनात आर्थिक, राजकीय, आंतराष्ट्रीय संबंध, कृषी, रोजगार यासह विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे. 


25 आणि 26 फेब्रुवारीला विविध विषयांचे ठराव करण्यात येणार 


अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस नेत्यांच्या दोन बैठका होणार आहे. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.  25 आणि 26 फेब्रुवारीला विविध विषयांचे ठराव करण्यात येणार आहेत. उद्या (25 फेब्रुवारी) आर्थिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय संबंध विषयांचे प्रस्ताव अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. तर 26 फेब्रुवारीला कृषी आणि किसान कल्याण, युवा रोजगार, शिक्षा आणि सामाजिक सक्षमीकरण या विषयांवरील प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत. 


या अधिवेशनात 'या' दोन गोष्टी महत्वाच्या असणार


26 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकाअर्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचे भाषण होणार आहे. खर्गेंच्या भाषणाने अधिवेशनाची सांगता होणार आहे. रायपूरच्या काँग्रेसच्या अधिवेशनात दोन गोष्टी महत्वाच्या असतील. एक म्हणजे काँग्रेस वर्किंग कमिटीची निवडणूक (Congress Working Committee Election) होणार की सर्व अधिकार अध्यक्षांना दिले जाणार? अध्यक्षांना अधिकार दिले तर महाराष्ट्रातून काँग्रेस वर्किंग कमेटीमध्ये कोणाची वर्णी लागणार? हा प्रश्न आहे. तर दुसरी गोष्ट 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची काय रणनीती असणार? भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्यासंदर्भात काँग्रेसकडून काही संकेत दिले जाणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) दृष्टीनं बघायचं झाल्यास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर रमेश चेल्लीनाथ समितीचा अहवाल सादर होतो का? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


यावर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा 


यावर्षी देशातील काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या संदर्भात अधिवेशनात काही चर्चा होणार का? या निवडणुकांमध्ये काँग्रेसची रणनिती काय असणार यावरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर देखील या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Lok Sabha Election : 2024 मध्ये काँग्रेस भाजपला धक्का देणार, सी व्होटरच्या सर्वेक्षणातून आकडेवारी समोर