माथेरान : माथेरानची राणी' म्हणून  ओळखलं जातं, ती मिनी ट्रेन लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पर्यटकांना पुन्हा एकदा या ट्रेन प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.  गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या नेरळ - माथेरान मिनी ट्रेन आता काही दिवसात सुरू होणार असल्याचे चित्र दिसत आहे. यासाठी रेल्वे प्रशासन कंबर कसून युद्धपातळीवर रेल्वे ट्रॅक दुरुस्ती चा काम सुरू केला आहे.

 जून 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे नेरळ ते माथेरान दरम्यान रेल्वे रूळ खचल्यामुळे मिनी ट्रेन बंद झाली होती.  काही दिवसांनी अमन लॉज ते माथेरान या दरम्यान  मिनी ट्रेन धावत होती.  माथेरानचा आर्थिक उत्पन्न पर्यटनावर अवलंबून असून मिनी ट्रेन बंद झाल्याने माथेरानच्या पर्यटनाला आर्थिक फटका बसला होता.  या सर्व बाबी लक्षात घेऊन माथेरानचे उपनगराध्यक्ष आशिष चौधरी यांनी मुंबई ते दिल्ली रेल्वे दरबारी पत्रव्यवहार केला. अखेर रेल्वे बोर्डाने नेरळ ते माथेरान या रुळावर लोखंडी स्लीपर काढून काँक्रिटचे स्लीपर टाकण्याचा कामाला परवानगी दिल्यानंतर या कामाला सुरुवात झाली आहे.

 दोन फुटांची नॅरो गेज लाईन एका शतकापूर्वी 1907 मध्ये बांधली गेली होती आणि आता ती युनेस्कोच्या यादीमध्ये आहे. आता याच रेल्वे रुळला मजबूत करण्यासाठी प्रथमच संपूर्ण रेल्वे ट्रॅक खाली कॉंक्रिट स्लीपर टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे पावसाळ्यात इथल्या रेल्वे ट्रॅकचे होणारे नुकसान टळेल. नेरळ ते माथेरान या मार्गासाठी सुमारे 37,500 काँक्रीट स्लीपरची आवश्यकता आहे. त्यापैकी सुमारे 2,500 स्लीपर आत्तापर्यंत आले आहेत, तर 35,000 स्लीपर येणे अपेक्षित आहेत. स्लीपर व्यतिरिक्त 800 मी ट्रेस रिटेनिंग वॉल, 1,300 मीटर सरंक्षण भिंती बांधल्या जाणार आहे. वर्षभरात हे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याची माहिती रेल्वे अधिकारी अंकुश कदम यांनी दिली आहे.  एकूणच काय तर या नव्या कामामुळे माथेरानच्या मिनी ट्रेनच्या सेवेत खंड न पडता या पुढे ती अविरतपणे पर्यटकांच्या दिमतीला हजर राहणार  आहे.  आता पुन्हा एकदा ही फुलराणी पर्यटकांसाठी होणार आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

संबंधित बातम्या :