NCP Agitation In Pune Against Inflation : देशात सध्या महागाई दिवसेंदिवस वाढत आहे, यामुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप होत आहे. याविरोधात आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. आज पुण्यात राष्ट्रवादीतर्फे भाजप विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी हनुमानाची आरती करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला, तसेच महागाईविरोधात हनुमानाला साकडंही घातलं आहे.
हनुमानाची आरती करून महागाईचा निषेध
सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईत मोठी वाढ झाली आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीने आज चक्क हनुमानाची आरती करत केद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले. पेट्रोल डिझेलच्या भावावरुन एकीकडे राजकारण चांगलंच तापलेलं असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आता सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढ आदी जीवनावश्यक गोष्टींच्या भावात वाढ होत असल्याने या महागाईच्या मुद्द्यावरून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पुण्यातील शनिपार चौकातील मारूती मंदिरासमोर हे आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाचा झेंडा उलटा लावत महागाई तसेच भ्रष्टाचार विरोधात निषेधही नोंदवण्यात आला.
सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित
या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्तेही जमले होते.
जवळपास 10 ते 12 भोंगे लावून थेट राज ठाकरेंना टार्गेट
पुण्यातील गुडलक चौकात याआधी 29 एप्रिललाही राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. महागाईच्या विरोधातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जुने भाषणे भोंग्यावर लावून राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले होते. केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ केली असल्याचा आरोप करत या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर भोंगा आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे ज्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेनी भोंग्यांच्या राजकारणाची सुरुवात केली, यामुळे राज ठाकरे यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या गुडलक चौकात राष्ट्रवादीने जवळपास 10 ते 12 भोंगे लावून थेट राज ठाकरेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.