MHADA Konkan Division Houses Lottery : आता सर्वसामान्य नागरिक तसेच कोकणवासीयांच्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. याचे कारण म्हाडा कोकण गृहनिर्माण मंडळाच्या सोडतीला (MHADA Lottery) अखेर मुहूर्त मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ठाण्यात ही सोडत काढली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
तब्बल 5 हजार 311 घरांसाठी सोडत
स्व:तच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, तब्बल 24 हजार अर्जदारांच्या सोडतीची प्रतिक्षा संपली असून आता म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. तीन वेळा तारखा देऊनही सोडत प्रशासकीय कारण देत म्हाडाने ही सोडत पुढे ढकलली होती, मात्र आता कोकणातील तब्बल 5 हजार 311 घरांसाठी 24 फेब्रुवारी 2024 रोजी सोडत निघणार आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढली जाणार आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीसाठी अखेर मुहूर्त मिळालाच
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5 हजार 311 घरांच्या सोडतीसाठी अखेर मुहूर्त मिळालाय. ही सोडत 13 डिसेंबर 2023 ला प्रस्तावित होती. मात्र प्रशासकीय कारण देत ती पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे बराच वेळ होत आला तरी सोडतीची नवीन तारीख जाहीर झालेली नव्हती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्याचा निर्णय म्हाडाने घेतला असला तरी त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ म्हाडाला मिळत नसल्याने सोडत रखडली होती. त्यामुळे 24 हजार इच्छुक अर्जदार प्रतिक्षेत होते.
15 सप्टेंबरपासून अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात
कोकण मंडळाच्या 5 हजार 311 घरांसाठी 15 सप्टेंबरपासून अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात झाली होती. त्यानंतर 17 नोव्हेंबरला मुदत याची संपली. या मुदतीत 31 हजार 433 अर्ज सादर झाले. त्यातील अनामत रक्कमेसह अर्ज सादर करणारे 24 हजार 303 अर्जदार सोडतीसाठी पात्र ठरलेत. सोडतीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून सोडतीसाठी म्हाडा, कोकण मंडळ पूर्णतः सज्ज आहे. पण सोडतीसाठी म्हाडाचा मुहूर्त मिळत नसल्याने ही सोडत रखडली होती. मुळात ही सोडत 7 नोव्हेंबरला होणार होती. पण कोकण मंडळाने अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ दिल्याने 7 नोव्हेंबरची सोडत पुढे ढकलून 13 डिसेंबरला सोडत काढण्याचे मंडळाने त्यावेळी जाहीर केले होते.