Rajesh Tope : कोरोनाच्या घटत्या रुग्णसंख्येत कोरोनाच्या XE या नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवली आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने 'फिट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यावेळी टोपे बोलत होते. काय म्हणाले आरोग्यमंत्री?


नव्या व्हेरिएंटबाबत चिंता करायची गरज नाही - राजेश टोपे


कोरोनाचा नवा XE व्हेरिएंटबाबत कुठलीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही, तसेच याबाबत स्पष्टीकरणही नाही, शिवाय कुठल्याही प्रकारची तशी दाहकता सुद्धा नाही. एक्स ई असेल किंवा कोणताही व्हेरिएंट असेल, त्याचा जरी आपण अभ्यास केला तरी तो 10 ते 15 टक्के जास्त सांसर्गिक आहे, मात्र अद्याप याबाबत कुठलीही माहिती नाही. त्यामुळे या नव्या व्हेरिएंटबाबत चिंता करायची गरज नाही, नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी कडूनही कुठल्याही प्रकारचे कन्फर्मेशन या संदर्भात मिळालेले नाही, तशी माहिती मिळाल्यावर त्या संदर्भातल्या सूचना आम्ही जनतेला देऊ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले


"महामारीला बाजूला सारून आपण बाहेर आलोय"


कार्यक्रमादरम्यान टोपे म्हणाले की, मागील काही वर्षे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपण सतत सांगत होतो. ते करू नका, हे करू नका. आता या सगळ्याला बाजूला सारून आपण बाहेर आलोय. त्यामुळे आज आपण एकत्र येऊन जागतिक आरोग्य दिन साजरा करू शकतो, आपल्याला संकल्प करायचा आहे, तो म्हणजे फिट महाराष्ट्राचा! 'बी फिट बी हेल्दी अँड सेव्ह लाइफ' या मोहिमेला आपण सुरुवात करतोय.


कोरोनाची लाट पुन्हा येऊ नये, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.


कार्यक्रमाला उपस्थित उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, निरोगी महाराष्ट्रचा संकल्प आपण आज करतोय. कोरोनामध्ये हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर किती महत्त्वाचे आहे ? हे जगाला कळलं. सगळ्या सहकाऱ्यांनी यामध्ये खूप चांगलं काम केलं. अलीकडच्या काळात सवयी लोकांच्या बदलल्या आहेत. आज सुद्धा मुंबईत काही रुग्ण आढळले आहेत, गुढीपाडवा निमित्याने मुख्यमंत्र्यांनी मास्क ऐच्छिक केला, मास्क काढून टाकला, तरी देखील आपण काळजी घेऊन मास्क घातला पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे. कोरोनाची पहिली व दुसरी लाट आपण पाहिली आहे. ही लाट पुन्हा येऊ नये, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.


केंद्रानं मुंबई महापालिकेचा हा दावा फेटाळला


देशात सध्या जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या (Covid-19) प्रादुर्भावात घट झाली आहे. दररोज देशात एक हजारांहून कमी प्रकरणं नोंदवली जात आहेत. त्यानंतर दोन वर्षांनंतर देशातील कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध संपले आहेत. तरीही फेस मास्क वापरणं आवश्यक आहे. कोरोनाच्या घटत्या रुग्णसंख्येत कोरोनाच्या XE या नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवली आहे. मुंबईतील दक्षिण आफ्रिकन वंशाच्या एका महिलेला XE व्हेरियंटची लागण झाल्याचा दावा मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आला आहे. तर, वैज्ञानिकांना अद्याप याविषयी कोणतेही सबळ पुरावे मिळाले नसल्यामुळं केंद्रानं मुंबई महापालिकेचा हा दावा फेटाळला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :