मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


संभाजीराजेंची राजकीय दिशा आज ठरणार
छत्रपती संभाजीराजे यांची आज दुपारी 12 वाजता पुण्यामध्ये पत्रकार परिषद आहे. यामध्ये ते आपली पुढची दिशा काय असेल याची घोषणा करणार आहेत. छत्रपती  संभाजीराजेंचा 3 मे 2022 ला राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला आहे. दोन दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली. आता संभाजीराजे त्यांच्या पुढच्या प्रवासाबद्दल काय निर्णय घेणार हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. 


निवडणुका सप्टेंबरमध्ये घेण्याची परवानगी द्या; राज्य निवडणुक आयोगाची विनंती
राज्यातल्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य निवडणूक आयोगाकडून अर्ज सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये महापालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये घेण्यास परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी द्या अशी विनंती करण्यात आली आहे.


राहुल गांधी पुन्हा कॉंग्रेस अध्यक्षपदी विराजमान होणार?  
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रं पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे सोपवावीत अशी मागणी नेहमी होत असते. आता राहुल गांधीही काँग्रेस अध्यक्षपदाबाबत सकारात्मक विचार करत असल्याची माहिती आहे. काँग्रेसची  संघटनात्मक मतदान प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे उदयपुर येथील चिंतन शिबिरात अध्यक्ष पदाबाबत चर्चा होणार नाही. तसेच संघटनात्मक पातळीवर पूर्ण प्रक्रिया पार पाडूनच राहुल गांधी अध्यक्षपदाची जबाबदारी  स्वीकारतील अशी सुत्रांची माहिती आहे. राहुल गांधी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिले तर, त्यांच्या विरोधात काँग्रेसमधून कोण उमेदवारी दाखल करणार याबाबत उत्सुक्ता आहे. ठरल्याप्रमाणे ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाबाबत निवडणूक पार पाडणार आहे. अशोक गेलहलोत, प्रियंका गांधी याचंही नाव अध्यक्ष पदाच्या चर्चेत असतं.


शरद पवार आज पुरंदर किल्ल्यावर, संभाजी महाराजांच्या जन्मस्थानाला भेट देणार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुरंदर किल्ल्यावर जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थानाला भेट देणार आहेत. ते किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे. संभाजी महाराज जयंती उत्सव समितीकडून आयोजित कार्यक्रमात पवार सकाळी 10 वाजता सहभागी होणार.  त्यानंतर 12 वाजण्याच्या आसपास शरद पवारांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. 
 
युपीत विरोध, मुबंईत मनसेची जोरात तयारी 
राज ठाकरेच्या अयोध्या दौऱ्यासाठी मनसे 11 ट्रेन बुक करणार असल्याची माहिती आहे. भाजप खासदाराकडून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होत आहे. तर मनसेकडून मात्र जोरात तयारी सुरु आहे. महाराष्ट्रभरातून मनसैनिक राज ठाकरेंच्या अगोदर अयोध्येत दाखल होतील. मोठं शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत मनसे आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा दौरा वादळी होण्याची शक्यता आहे.


तुळजापूर बंदची हाक


तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांचा अवमान प्रकरणी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि व्यवस्थापक यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून आज तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे. तुळजाभवानी गाभाऱ्यात जिल्हाधिकारी यांनी प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे संभाजीराजेंना अडवण्यात आले. संभाजीराजेंनी स्वतः जिल्हाधिकारी यांना फोन करून सुद्धा त्यांना गाभाऱ्यात सोडले नाही. छत्रपती घराण्यातील कोणताही सदस्य भवानी मातेच्या दर्शनास येतो तेव्हा तो थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतो. ही शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याने संभाजीराजे नाराज झाले आहेत. तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिलगिरी व्यक्त केली तरीदेखील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. 


अजित पवार नाना पटोलेंच्या वक्तव्यावर बोलणार
राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. पटोलेंच्या टीकेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.विदर्भात जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला राष्ट्रवादीने साथ देऊन जिल्हा परिषद अध्यक्ष बसल्यानंतर नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली होती. यावर सकाळी 9.30 वाजता अजित पवार राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात बोलतील.


मुंबई विद्यापीठाचा विशेष दीक्षांत कार्यक्रम
मुंबई विद्यापीठाचा आज विशेष दीक्षांत समारंभ होणार आहे. या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात तबलावादक पद्मभूषण झाकीर हुसेन यांना एलएलडी आणि उद्योजक शशिकांत गरवारे यांना डीलीट पदवी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोशारी , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, कुलगुरू उपस्थित राहणार आहेत. वेळ सकाळी 11 वाजता. स्थळ- फोर्स कॅम्पस दिक्षांत सभागृह 


 बुलढाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षा वर्गाचा प्रारंभ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा द्वितीय वर्ष 21 दिवसांचा शिक्षा वर्गाचा खामगाव येथे प्रारंभ झाला आहे. या शिक्षा वर्गाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे  खामगाव येथे मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवारी रात्री मोहन भागवत यांच खामगावात आगमन झालं. मोहन भागवत यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था असल्याने शिक्षा वर्गाच्या ठिकाणी पोलीस छावणीच स्वरूप आलं आहे. नागपुरात स्फोटक सापडल्याने सुरक्षा व्यवस्था अजूनही कडक करण्यात आल्याचं चित्र आहे.


अहमदनगरमध्ये  'प्रतिबिंब' या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन
अहमदनगरच्या न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या संज्ञापन विभागातर्फे पंधराव्या 'प्रतिबिंब' या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आलय. या महोत्सवात 70 फिल्म सहभागी झाल्या असून 30 फिल्म प्रदर्शित केल्या जाणार आहे,  तर 18 बक्षिसे निवडली जाणार आहे. दिग्दर्शन नागराज मंजुळे आणि दिग्दर्शक भाऊ खराडे हे याच विभागात शिकले आहेत.