मुंबई : आज महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसीच्या डोसचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. दिवसभरात एकूण 12 लाख नागरिकांना कोरोनाचे डोस देण्यात आले. ही माहिती महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी शेअर केली आहे. रात्री 8 वाजेपर्यंत 12 लाख 6 हजार 327 जणांना आज लस देण्यात आली आहे. काल शुक्रवारी देशात गेल्या पाच दिवसात दुसऱ्यांदा एकाच दिवशी कोरोना लसीचे एक कोटी डोस देण्याचा विक्रम करण्यात आला आहे. त्यामुळे देशात आता लसीकरणाने वेग घेतला असल्याचे पहायला मिळत आहे.


ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच विक्रमी लसीकरण
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्याने आज विक्रमी कामगिरीची नोंद करीत सायंकाळी सातपर्यंत 1 लाख 1 हजार 297 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरणाची ही पहिलीच वेळ आहे.


ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 51 लाख 25 हजार 876 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी 36 लाख 68 हजार 994 नागरिकांना पहिल्या डोसचे तर 14 लाख 56 हजार 882 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे 461 सत्र आयोजित करण्यात आले. 


Corona Vaccination : लसीकरणाचा नवा विक्रम; एकाच दिवशी 1.30 कोटी डोस, आतापर्यंत 65 कोटीचा टप्पा ओलांडला


दरम्यान, संपूर्ण राज्यात आज विक्रमी लसीकरण झाले असून दिवसभरात 12 लाख 3 हजार 327 नागरिकांचे लसीकरण झाले. ही आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. राज्याच्या जोडीला ठाणे जिल्ह्यातही विक्रमी लसीकरणाची नोंद झाली आहे.


देशातही लसीकरणाचा नवा विक्रम
देशात गेल्या पाच दिवसात दुसऱ्यांदा एकाच दिवशी कोरोना लसीचे एक कोटी डोस देण्याचा विक्रम करण्यात आला आहे. मंगळवारी एकाच दिवसात तब्बल 1.30 कोटी लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे. याचसोबत भारतात आता कोरोना लसीचे 65 कोटीहून जास्त डोस देण्यात आले असून देशातील 50 टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे. हिमाचल प्रदेशने राज्यातील 100 टक्के लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला असून असं करणारे ते देशातील पहिलेच राज्य आहे.


ऑगस्ट महिन्यात एकूण 18.6 कोटी डोस देण्यात आले आहेत. एकाच महिन्यात कोरोनाच्या इतक्या मोठ्या प्रमाणात डोस देणारा भारत हा एकमेव देश आहे. तर 21 ते 27 ऑगस्ट या दरम्यान, एकाच आठवड्यात देशात एकूण 4.66 कोटी लसी देण्यात आल्या, हाही एक विक्रमच आहे.