Maharashtra Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल किंवा प्रकाश आंबेडकर असतील यांच्यामधील वाद अजूनही मिटलेला नाही. अनेक जागांवर बंडखोरीची भीती असल्याने सागर बंगल्यावर गेल्या तीन दिवसांपासून फक्त वाद मिटवण्याचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. आज मध्यरात्रीपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीवेळी उदय सामंत आणि शंभूराज देसाई उपस्थित होते. महायुतीमध्ये अजूनही काही वादामधील असलेल्या जागांवर तोडगा काढण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत खल सुरू होता. पालघर, संभाजीनगर, कल्याण, ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर महायुतीत रस्सीखेच सुरु आहे.  


लढतींचे चित्र अजूनही स्पष्ट नाहीच


दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये सुद्धा वादातील जागांवरती अजूनही कुस्ती सुरूच आहे. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसकडून आला आहे. मात्र, त्याला ठाकरे गटाकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये हा वाद सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा आपला पत्ता पूर्णपणे खोललेला नाही. त्यामुळे राज्यामधील अजूनही लढतींचे चित्र स्पष्ट झालेलं नाही. 


शरद पवार गटाची पहिली यादी आज येणार 


महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत भाजपने 24 उमेदवारांची घोषणा केली आहे. ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसकडून 12 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे, तर राष्ट्रवादीची आज पहिली यादी येण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही त्यांचे शिरूरमधून अमोल कोल्हे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, नगर दक्षिणमधून निलेश लंके यांची उमेदवारी निश्चित असून केवळ औपचारिक घोषणा होईल. एकंदरीतच राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराने थोडासा वेग घेतला असला, तरी लढतींचे चित्र मात्र अजून पूर्णतः स्पष्ट झालेलं नाही.


पाच जागांवर महाविकास आघाडीमध्ये पेच


दरम्यान, पाच जागांवर महाविकास आघाडीमध्ये पेच असल्याचे दिसून येत आहे. सांगली, भिवंडीसह दक्षिण मध्य मुंबई मतदार संघ काँग्रेसला अनुकूल असल्यास सांगत काँग्रेसने मतदारसंघावरती दावा केला आहे. मात्र, या ठिकाणी उद्धव ठाकरेंकडून अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी वाढली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आतापर्यंतच्या जागा वाटपामध्ये भिवंडी जागा ही काँग्रेसला होती. मात्र, आता या जागेवर शरद पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. काँग्रेस दावा सोडत नसल्याने या जागेवरती सुद्धा घामासन सुरू आहे. सांगलीच्या जागेवरून सुद्धा महाविकास आघाडीमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. याठिकाणी सुद्धा मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव देण्यात आला असला तरी हा निर्णय दिल्लीमधूनच होण्याची शक्यता आहे. मात्र, या मैत्रीपूर्ण लढती महाविकास आघाडीसाठी फायदेशीर ठरतील का? असा सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये प्रश्न उपस्थित होत आहे. 


नाना पटोलेंची बैठकांना दांडी


या जागांचा पेस सोडवण्यासाठी आतापर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये अनेक बैठकांवर बैठका झाल्या असल्या तरी तिढा मात्र काही सुटलेला नाही. ठाकरेंकडून उमेदवार घोषित करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीची गुरुवारी बैठक झाली. मात्र या बैठकीसाठी नाना पटोले गैरहजर होते. काल झालेल्या बैठकीला सुद्धा नाना पटोले यांनी पाठ फिरवली होती. दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 3 एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी जागा वाटपाची चर्चा झाली असून फक्त प्रचाराची रणनीती ठरविण्यात येत असल्याचं म्हटलं असलं तरी काही जागांवरती अजूनही वाद सुरूच आहे. त्यामुळे राज्यातील लढतींचे चित्र स्पष्ट झालेले नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या