जालना : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर मराठा उमेदवार निवडणुकीत (Maratha Candidate) उतरवण्याच्या भूमिकेवर अंतिम निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज आंतरवाली सराटीत (Antarwali Sarathi) बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठा उमेदवारांबाबत महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात मराठा समाजाने उमेदवार देण्याबाबत घेतलेल्या बैठकीचा अहवाल जरांगे यांच्याकडे दिला जाणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करायचे का?, कोणत्या जिल्ह्यात कुणाला उमेदवारी द्यायची, अन्यथा लोकसभा निवडणूकच लढवायची नाही याबाबत आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 


मनोज जरांगे यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची बैठक आंतरवाली सराटीत आयोजित केली आहे. सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरात मराठा समाजाच्या बैठकीत शुक्रवारी झालेल्या राड्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. 


गावागावात बैठका घेऊन चर्चा 


मराठा समाज बांधवांनी लोकसभा निवडणूक लढवायची की एकच उमेदवार द्यायचा, या दोन्ही विषयांवर गावागावात बैठका घेऊन चर्चा केली जात आहे. या बैठकींचा अहवाल मनोज जरांगे पाटील यांना आज कळवला जाणार आहे. अनेक गावात चर्चा हाऊन सर्वानुमते ठराव संमत होत आहेत. त्यानंतर यात मनोज जरांगे पाटील जो उमेदवार देतील, त्या उमेदवाराला सर्व गावांनी मतदान करायचे असा ठराव सर्वानुमते पास करण्यात येत आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत जरांगे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. 


मनोज जरांगेंनी जालना लोकसभेची जागा लढवावी


सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना येथील शितल मंगल कार्यालयात बैठक  घेण्यात आली. या बैठकीत काही महत्वाचे ठराव घेण्यात आले. त्यात मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः जालना लोकसभेची जागा लढवावी, असा एकमुखी ठराव घेण्यात आला. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील युवकांनी आत्महत्या करू नये यासाठी समाजातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींनी जागृती करावी, जरांगे पाटील ठरवतील त्याप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णयही घेण्यात आला. संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत जो हाणामारीचा प्रसंग झाला, तसा प्रसंग उदभवू नये म्हणून थेट मनोज जरांगे यांनीच या मतदारसंघात उभे राहावे, असेही या बैठकीत एका समाजबांधवाने आवर्जून स्पष्ट केले. 


मनोज जरांगेंची वकिलांशी चर्चा...


लोकसभेला उमेदवार उभा करण्यासंदर्भात वकिलांची बैठक आंतरवाली सराटीमध्ये शुक्रवारी पार पडली. यावेळी मनोज जरांगे पाटील व वकिल बांधवांमध्ये चर्चा झाली. आंतरवाली सराटीत शंभर वकिलांच्या टिमसोबत मनोज जरांगे पाटील यांनी बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा करुन पुढील कायदेशीर बाबीचीही चर्चा केली आहे. या वकिलांच्या चर्चेनंतर जरांगे पाटील महाराष्ट्रातील गावागावातून आलेल्या अहवालानंतर आज पुढील दिशा जाहीर करणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Manoj Jarange Patil : 'संघर्षयोद्धा'चित्रपटात अजय गोगावलेच्या आवाजात हृदयस्पर्शी गाणं