Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) पहिल्या टप्प्यातील रणधुमाळीला विदर्भापासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर महायुती मधील सर्व प्रमुख नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi In Maharashtra), उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath), राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह महायुतीतील प्रमुख स्टार प्रचारकांची मांदियाळी आज विदर्भात दाखल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा आज चंद्रपुरात (Chandrapur) होत आहे.


भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या (Sudhir Mungantiwar) प्रचारासाठी तब्बल 10 वर्षांनी मोदी चंद्रपुरात येणार असून या सभेच्या निमित्याने ते महाराष्ट्रात आपल्या प्रचाराचा आज नारळ फोडणार आहे. तर तिकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विदर्भातील तीन मतदारसंघात भव्य जाहीर सभा पार पडणार आहे. ज्यामध्ये दुपारच्या सुमारास वर्धा तर संध्याकाळच्या सुमारास भंडारा आणि नागपूरात योगी आदित्यनाथ संबोधित करणार आहेत. सोबत राज्याचे मुख्यमंत्री हे देखील दोन दिवसांपासून विदर्भात तळ ठोकून आहेत. त्यामुळे आज विदर्भात महायुतीच्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी बघायला मिळत आहे.   


विदर्भात महायुतीच्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा आज चंद्रपुरात होत आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी तब्बल 10 वर्षांनी मोदी चंद्रपुरला येणार आहेत. चंद्रपूर शहराजवळ मोरवा विमानतळाच्या अगदी बाजूला विस्तीर्ण 16 एकर परिसरात मोदींच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुपारी चार वाजता होणाऱ्या या सभेसाठी भाजपने युद्ध स्तरावर यंत्रणा राबविली आहे.


हा संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अनुकूल करण्यात आला असून सुमारे एक लाख लोक या सभेला यावेत या दृष्टीने अगदी शुष्म नियोजन भाजपने केल्याचा दावा करण्यात आला आहे. तर या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर बडे नेते उपस्थित राहणार आहेत.  दरम्यान, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान यावेळी नेमके काय भाष्य करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  


विदर्भात आज योगी आदित्यनाथ यांच्या सभांचा धडाका 


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि महायुतीचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ हे देखील आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. विदर्भात योगी आदित्यनाथ यांच्या तीन सभा होणार आहेत. यात दुपारी 2.30 वाजता वर्ध्यात, तर संध्याकाळी 4. 30 वाजताच्या सुमारास भंडार येथे तर संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास नागपूर लोकसभा मतदारसंघात योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभा होणार आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट इथं भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सभेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन वाजता संबोधित करणार आहे. दुपारी होणाऱ्या या सभेला विदर्भातील भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे.


वर्ध्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना रंगतो आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे आणि भाजपचे रामदास तडस यांच्यात काट्याची टक्कर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हिंगणघाट येथे होणाऱ्या योगीच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेच्या अनुषंगाने सभास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त आणि इतर सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.  


इतर महत्वाच्या बातम्या