मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.  कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी हा लॉकडाऊन होऊ शकतो. याबाबत आज मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते आणि सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन बाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. कोरोना वाढत चालल्याने आता 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. 


दरम्यान लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन आवश्यक आहे. आज मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत हाच मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला असून येणाऱ्या तीन-चार दिवसात त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल, असं वडेट्टीवार म्हणाले. तीन आठवड्यांचा हा लॉकडाउन कडक स्वरूपाचा असायला हवा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनच्या या कालावधीत फक्त भाजी आणि अत्यावश्यक सेवासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा द्यावी अशी मागणीही केली आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. 


वडेट्टीवार यांनी सांगितलं की, अकरा तारखेला होणारी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढील निर्णयापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पुढे परीक्षा केव्हा होईल याची तारीख नंतर सांगण्यात येईल. तसेच महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डासह केंद्र सरकार विविध परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्या अशी मागणी केंद्र सरकारकडे महाराष्ट्रकडून केली जाणार आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले. 


राज्यात काल दिवसभरात 56 हजार 286 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात काल दिवसभरात 56 हजार 286 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 376 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल 36 हजार 130 जण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईतही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताच आहे. शहरात काल 8 हजार 938 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 22 लाख 82 हजार 191 वर पोहोचली आहे. तर सध्या 5 लाख 21 हजार 317 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 26 लाख 49 हजार 757 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. रुग्ण बरं होण्याचा दर 82.05 टक्के आहे. राज्यातील मृतांचा आकडा 57 हजार 028 वर पोहोचला आहे. मृत्यूदर 1.77 टक्के आहे. सध्या 27 लाख 2 हजार 613 जण होम क्वॉरन्टीन असून 22 हजार 661 जण इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टीन आहेत. आतापर्यंत राज्यात 26 लाख 49 हजार 757 कोरोनाबाधित रुग्ण होऊन घरी गेले आहे.