मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हजारो नागरिक देशातील विविध शहरांमध्ये अडकून पडले. दरम्यान, आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना परत आणण्याबाबत राज्यांनी देखील प्रयत्न सुरू केले. या साऱ्या घडामोडींमध्ये मुंबई, पुणे या ठिकाणी अडकलेल्या कोकणी माणसाला आपल्या मुळगावी आणण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. कोकणातील स्थानिक राजकीय नेत्यांनी आता यावर भाष्य करायला सुरूवात केली आहे. पण, या मुद्यावर देखील राजकारण आणि एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. अगदी भूमिका घेताना एकाच पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये देखील संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेमके काय सुरू आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर कोकणातील काही गावांनी गावच्या वेशी देखील बंद केल्या. त्यावर देखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा, वाद-विवाद सुरू झाले. अगदी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून मुंबई, पुणे या ठिकाणी वास्तव्याला असलेल्या कोकणी माणसाला त्याच्या मुळगावी आणण्याबाबत चर्चा सुरू होती. तसेच काहींनी तशी इच्छा देखील व्यक्त केली होती. पण, त्यावर आता राजकारण सुरू झाल्याचे देखील चित्र आहे. ठाम भूमिका घेण्यामध्ये कोकणातल्या राजकीय नेत्यांमध्ये देखील संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.
काय आहे नेत्यांचे म्हणणे?
मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरे रेड झोनमध्ये येतात. या शहरांमध्ये कोकणातील लाखो लोक वास्तव्य करत आहेत. त्यांना मुळगावी परत आणण्याबाबत विचारले असता, सध्या याबाबत सरकारशी चर्चा सुरू आहे. मोठ्या प्रमाणात कोकणी माणसांना गावी आणायचे झाल्यास त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील काळजी घ्यावी लागेल. शिवाय, त्यांना कशाने आणायचे? यावर देखील सध्या विचारविनिमय सुरू आहे. त्यांना सुरक्षित आपल्या गावी आणण्याकरता सारे प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया शिवसेना आमदार आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तर, तुमचे सरकार असताना काहीतरी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यास त्यांची सोय कशी करणार? त्यांच्या टेस्ट करण्याबाबत कोकणात काही व्यवस्था आहे का? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
पाहा व्हिडीओ : राज्यात पुढील 5 दिवस पावसाचे; वादळी पाऊस, गारपिटीचीही शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
दरम्यान, एकाच पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये देखील भूमिका घेताना संभ्रम असल्याचे चित्र आहे. कारण, शिवसेना आमदार भास्कर जाधव आणि राजन साळवी यांनी याबाबत तातडीने पावले उचलली जावीत. लोकांना त्यांच्या गावी आणले जावे अशी मागणी केली आहे. त्याचवेळी भाजपचे नेते प्रमोद जठार देखील कोकणी माणसाला त्याच्या मुळगावी आणण्याबाबत मागणी करताना दिसत आहेत.
काय आहे मुंबईतील कोकणी माणसाची अवस्था?
मोठ्या प्रमाणावर कोकणी माणूस सध्या मुंबई, पुणे या ठिकाणी राहतो. अनेक जण एकत्र राहत असल्यानं त्यांना जागा देखील कमी पडत आहे. त्यात कामबंद असल्यानं काहींना आर्थिक चणचण देखील भासू लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेकांमध्ये भीती देखील दिसून येत आहे. चाळी आणि झोपटपट्टींमध्ये देखील कोरोनाच्या प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. काम बंद असल्याने घरभाडे द्यायचे कसे? या विवंचनेत देखील अनेक जण आहेत.
रत्नागिरी, सिंधदुर्गातील काय आहे स्थिती?
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये आजरोजी एकही कोरोनाबाधित रूग्ण नाही. सिंधुदुर्गमध्ये कोरोना बाधित असलेल्या एकमेव रूग्णाला रूग्णालयातून सोडून देण्यात आले आहे. तर, रत्नागिरीमध्ये देखील पाचही कोरोनाबाधित रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, खेडमधील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकंदरीत सारी परिस्थिती पाहता दोन्ही जिल्ह्यांमध्ये उद्योगधंद्यांना काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
औरंगाबादमध्ये सामूहिक नमाजासाठी जमलेल्यांचा पोलिसांवर हल्ला; पोलीस अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी जखमी
कोरोनाच्या झटपट टेस्टसाठी प्रवरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान; अल्प खर्चात लवकर चाचणी
कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 100 एसटी बस पाठवणार : अनिल परब