Maharashtra Lockdown & COWIN Registration LIVE | ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले, शासनाचे आदेश जारी
Maharashtra corona vaccination lockdown updates : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडणार आहे. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय होण्याचं अपेक्षित आहे. पहिला महत्त्वाचा विषय म्हणजे राज्यातील मोफत लसीकरण आणि दुसरा म्हणजे लॉकडाऊन वाढणार की संपणार? कोरोना आणि लॉकडाऊनसंदर्भातील सर्व अपडेट्स या लाईव्ह अपडेटमध्ये....
ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले
नागपुरात कोरोनाच्या फैलावामुळे रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात अॅम्ब्युलन्सची संख्या अपुरी ठरताना दिसत आहे. हीच स्थिती लक्षात घेऊन नागपूर महापालिकेच्या 'आपली बस' या परिवहन सेवेच्या ताफ्यातील 25 बसेस आता रुग्णसेवेसाठी तयार करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णाला ऑक्सिजन देत रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने या बसेसमध्ये आवश्यक बदलही करण्यात आले आहेत. या बसेसमध्ये ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था राहणार असून सोबत दोन अटेंडटही रुग्णाला रुग्णालयात नेताना बसमध्ये राहणार आहे. रुग्णसेवेसाठीच्या या बसेस गरजू नागरिकांना नि:शुल्क उपलब्ध होणार आहे. शहरातील महापालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये अशा दोन बस 24 तास उपलब्ध राहतील तर महापालिकेच्या मुख्यालयात अतिरिक्त पाच बसेस उपलब्ध राहतील. गरजू नागरिकांनी प्रत्येक झोन कार्यालयातून या बससेवेसाठी संपर्क साधवा, असे आवाहन मनपाने केले आहे. दरम्यान, महापालिकेने 16 बसेस शववाहिका म्हणूनही उपलब्ध केल्या आहेत.
मुंबईसह राज्यातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई क्रिकेट असोसिएशननं तिसऱ्या मुंबई ट्वेन्टी ट्वेन्टी लीगचं आयोजन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ट्वेन्टी ट्वेन्टी लीगचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी ही माहिती दिली. राज्यातला आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढू नये, तसंच मुंबई क्रिकेटशी संबंधित खेळाडू, पंच, पदाधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबई ट्वेन्टी ट्वेन्टी लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात कोविड सेंटरचे डॉक्टरच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचं एका ऑडिओ क्लिपमधून बाब उघड झालं आहे. आटपाडी मधील एका डॉक्टरानेच रेमडेसिवीर उपलब्ध करुन देण्यासाठी 30 हजार रुपये लागत असल्याचं सांगितले. डॉ.अमृत रावण असे डॉक्टरचे नाव असल्याचा क्लिपमध्ये उल्लेख आहे. ज्याला इजेक्शन हवं होतं त्या नागरिकाने योग्य दरात दुसरीकडून रेमडेसिवीर मिळाल्याने 30 हजार दराने इजेक्शन खरेदी केले नाही.
बुलढाणा मेहकर ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहिमेचे नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे लस घेण्यासाठी आलेल्यांनी एकच गर्दी केली होती. यावेळी गर्दी वाढल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं. मेहेकर येथील ग्रामीण रुग्णालयाला 220 कोविशिल्ड लस प्राप्त झाल्या होत्या. लस घेण्यासाठी मेहेकर येथील नागरिकांनी एकच गर्दी केली. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. अगोदरच लसीचा तुटवडा असून आपल्याला लस मिळते की नाही या विचाराने नागरिक गर्दी करतांना दिसले.
मुंबई : लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात होत असून लसीकरण मोहिमेची नोंदणी प्रक्रिया बुधवारी, 28 एप्रिलपासून सुरु झाली आहे. बुधवारी जवळपास 1 कोटींहून अधिक नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केल्याची माहिती मिळत आहे. नोंदणी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कोविन पोर्टलवर अडचणी आल्या मात्र नंतर (http://cowin.gov.in), आरोग्य सेतु आणि उमंग अॅप वर रजिस्ट्रेशन व्यवस्थित सुरु झालं. रात्री आठ वाजेपर्यंत एकूण 79 लाख 65 हजार 720 लोकांनी लसीसाठी नोंदणी केली होती.
सीरम इंस्टिट्यूटकडून कोरोना लसीची किंमत कमी, अदर पुनावाला यांची ट्विटद्वारे माहिती
15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम, मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय
महाराष्ट्र राज्य शासनानं लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात सर्व नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात रात्रंदिवस पहारा देणाऱ्या पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठी कलाकारांनी आज पुण्यातील वडगाव धायरी भागातील चेक पोस्टला भेट दिली. अमेय वाघ, संस्कृती बालगुडे, मृण्मयी देशपांडे, अक्षया देवधर, राहुल सोलापुरकर, आनंद इंगळे हे कलाकार यावेळी उपस्थित होते. लॉकडाऊनमधील निर्बंधांचे कठोर पालन व्हावं यासाठी झटणाऱ्या पोलिसांना आपण देखील सहकार्य करायला हवं असं मत या कलाकारांनी यावेळी व्यक्त केलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात आठवडा बाजारात नागरीकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून येतंय. आठवडी बाजारावर शासनाने बंदी घातली असली तरी देखील पोलीस प्रशासन, नगरपंचायत मात्र याकडे पूर्णपणे डोळेझाक करत आहे. कुडाळ आठवडा बाजारात आलेल्या नागरिक ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतात ना तोंडावर मास्क आहे. तर नागरिक विना मास्क फिरताना कॅमरेऱ्यात कैद झाले असून त्यांना विचारल्यावर तोडं लपवताना दिसत आहेत. काही नागरिक बाजारपेठत सार्वजनिक ठिकाणी थुंकताना सुद्धा कैद झालेत. तर मासळी बाजारातसुद्धा नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. प्रशासनाची मात्र या सर्वाकडे डोळेझाक होत आहे. लॉकडाऊन असताना देखील नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचा सर्रास भंग केलेला दिसतो.
कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता आता रत्नागिरी जिल्ह्यात देखील बेड्स कमी पडत आहेत. दरम्यान, ही सारी परिस्थिती पाहता रत्नागिरी नगरपरिषदेनं देखील 25 बेड्सचं कोविड सेंटर उभारले आहे. पाच डॉक्टर, नऊ नर्सेस, वॉर्डबॉय, औषधांचा योग्य साठा, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक असा कर्मचारी वर्ग या ठिकाणी आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरातील कोरोनाची सारी परिस्थिती पाहता आता प्रशासनाला देखील मोठा हातभार या कोविड सेंटरमुळे लागत आहे.
पालघर जिल्ह्यामधील आठ तालुक्यात 2 लाख 7 हजार 849 व्यक्तींचे लसीकरण करून जिल्ह्याने कमी कालावधीत दोन लाखाचा आकडा पार केला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये एकूण 88 लसीकरण सत्र असून 71 शासकीय तर 17 खाजगी सत्रा मधून दैनंदिन साधारण 6 हजार 600 व्यक्तींना लस दिली जाते आतापर्यंत 1 लाख 74 हजार 645 जणांना पहिला डोस दिला गेला तर 32 हजार 204 जणांना दुसरा डोस देण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.
लसींचा साठा संपत आल्याने पिंपरी चिंचवड शहरात अनेक केंद्रावर आज लसीकरण बंद असेल. त्यामुळे महापालिकेच्या 64 पैकी केवळ 12 केंद्र खुली ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय झालाय
- एकूण कोरोनाबाधित रुग्ण : एक कोटी 79 लाख 97 हजार 267
- एकूण मृत्यू : 2 लाख 1 हजार 187
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 48 लाख 17 हजार 371
- एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 29 लाख 78 हजार 709
- देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 14 कोटी 78 लाख 27 हजार 367 डोस
Coronavirus Cases India 28 April : भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा दररोज नवा उच्चांक गाठत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 360,960 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3293 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, 2,61,162 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी सोमवारी देशात 323,023 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं.
विदेशी लसींसाठी राज्याला आणखी प्रतिक्षा करावी लागणार. लस साठवण्यासाठीची व्यवस्था नसल्यामुळं अडचणी. कॅबिनेटच्या बैठकीत या विषयावरही चर्चा होण्याची चिन्हं.
राज्सात लसीकरण मोहिम लवकर आणि नियोजित व्हावी यासाठी खास वेगळा विभाग करावा का? या संदर्भात आज मंत्रीमंडळ बैठकीत होणार चर्चा. लसीकरणाची जबाबदारी एका कॅबिनेट मंत्री किंवा सनदी अधिकारी यांच्यावर सोपवण्याची शक्यता. लस खरेदीसाठी समिती गठीत केली त्याप्रमाणे लसीकरण राज्यात योग्य वेळेत व्हावे यासाठी वेगळे खास विभाग सुरू करण्साचा शासनाचा विचार. जिल्हास्तर, विभागीय स्तर आणि राज्य स्तरावर हा विभाग काम करेल. राज्यात साधरण ५ कोटी ७१ लाख नागरिक १८ ते ४५ वयोगटात आहेत. राज्य शासन या वयोगटातील लोकांना जास्तीत जास्त ६ महिन्यात संपूर्ण लसीकरण करण्याच्या विचारात आहे
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यातील लॉकडाऊन संपायला अवघे दोन दिवस उरलेले आहेत. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन वाढणार की संपणार याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीत होणार आहे. राज्यातील लॉकडाऊन तसेच लसीच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळात काय निर्णय होतो याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, लगेच लॉकडाऊन उठवला जाणार नसून कोरोनावर पूर्णपणे मात करण्याच्या प्रयत्नात लॉकडाऊन वाढण्याचे संकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले आहेत.
मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ आणि उदय सामंत या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार आता लॉकडाऊन वाढवण्याच्या तयारीत आहे, असे संकेत दिले आहेत. गेल्या 14 एप्रिलला मुख्यमंत्र्यांनी राज्यात कडक निर्बंध लावले होते. पण परिस्थिती जैसै थे होती. त्यानंतर 22 एप्रिलपासून पुढील 15 दिवस लॉकडाऊनला सुरुवात झाली. कोरोनाग्रस्तांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली पण तिसरी लाट येण्याआधी सरकारला राज्यात बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत.
ज्यामध्ये सर्वात प्रथम लसीकरण, आयसीयू बेड्सची संख्या, जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठ्याचा समावेश आहे. त्यासाठी लॉकडाऊन गरजेचं असल्याचं मत महाविकास आघाडीतले नेते करत आहेत.
कॅबिनेट बैठकीत लॉकडाऊन वाढवायचा की नाही याची प्राथमिक चर्चा केली जाईल. यामध्ये शहरनिहाय कोरोनाग्रस्तांची आकडेवारी समोर मांडली जाईल, लॅाकडाऊनचा किती परिणाम सध्या होतोय आणि वाढवला तर किती परिणाम होईल यावर सगळं अवलंबून आहे.
लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार पडतोय. पण रुग्णसंख्या कमी करण्यात मोठी मदत होत आहे. 1 मे पासून लसीकरण सुरु करायचं आहे, राज्यात सध्या 4 हजार लसीकरण केद्र आहेत ते दुप्पटीनं वाढवायचे आहेत, 18 ते 44 पर्यंत साधारणत: साडेपाच कोटींच्या घरात संख्या आहे. लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये यासाठी सरकारला नियोजन करायचे आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवलं तर नक्कीच याचा परिणाम राज्यातली कोरोनाची परिस्थिती सुधारण्यावर होईल असे मंत्री बोलतात.
राज्यात मोफत लसीकरण? आज निर्णय अपेक्षित
1 मेपासून केंद्र सरकारनं 18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. देशातील अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अशातच आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थिती, मोफत लसीकरण, लॉकडाऊन याचसोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आज दुपारी साडेबारा वाजता मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. दरम्यान, या बैठकीत राज्यातील मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार असून त्यानंतरच मुख्यमंत्री यासंदर्भातील निर्णय जाहीर करतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.
देशभरात येत्या 1 मे पासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात 45 वर्षांवरील सर्वांचा मोफत लसीकरण करण्यात आलं होतं. मात्र 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण मोफत होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. अशातच देशातील अनेक राज्यांनी 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार, हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -