Maharashtra News Updates: मुंबई, पुण्यासह राज्यभरात पावसाची हजेरी; गावखेड्यात शेतकऱ्यांचं नुकसान, देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर"

पल्लवी गायकवाड Last Updated: 09 Jun 2024 01:19 PM
Sindhudurg Rain : तळाशील खाडीत बोट बुडून दोघे बेपत्ता, एकजण सुखरुप

Sindhudurg Rain : मालवण तालुक्यातील तळाशील खाडीत बोट बुडून दोघे बेपत्ता झाले, तर एक जण पोहत बाहेर पडला. ही घटना रात्रीची असून प्रशासनाने सकाळपासून दोन बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यात एकाचा मृतदेह सापडला असून बुडालेली बोट बाहेर काढण्यात यश आलं आहे. अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने बोट तळाशील खाडीत बुडून ही दुर्घटना घडली.

Sangli Rain : मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी प्रवाहित

Sangli Rain : सांगलीत कृष्णा नदी पात्र परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नदी प्रवाहित झाली आहे. कृष्णा नदीवरील सांगलीवाडी जवळच्या बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागलं आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ओढ्यांवरील वाहतूक बंद झाली आहे. सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

Vasai Rains : वसई-विरारमध्ये रस्त्यांची हालत; वाहतूककोंडीमुळे फटका

Vasai Rains : मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस पडला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी निचऱ्यासाठी टाकण्यात आलेल्या गटाराच्या खड्ड्यात माती टाकल्यामुळे पाणी जायला जागा नाही. यासोबतच पावसाच्या पाण्याने रस्ता खचल्याने अवजड वाहनं खड्ड्यात फसत आहेत. महामार्गाच्या दोन्ही लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. 

Mumbai : सहा वर्षीय मुलाचा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

Mumbai : मुलुंड येथे राहणाऱ्या एका सहा वर्षीय चिमुकल्याचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.उन्हाळी सुट्टीनिमित्त उल्हासनगर येथे मामाच्या गावाला आलेल्या सहा वर्षीय सार्थकच्या जेवणात काहीतरी आढळल्याने त्याला उलट्या होऊ लागल्या, त्याला कल्याण-कर्णिक रोड येथे असलेल्या रॉयल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप  नातेवाईकांनी केला. या घटनेमुळे नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये गोंधळ घातला

Pune Rain : पुलाच्या दुरुस्तीकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी पुष्पा 2 स्टाईलमध्ये अनोखं आंदोलन

Pune Rain : विश्रांतवाडी येथील शांतीनगर भागात अनेक वर्षांपासून पुलावर पाणी जमा होतं. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सचिन भोसले यांनी मागणी केल्यानंतरही पालिकेने अजून त्यांची मागणी पूर्ण केली नाही, त्यामुळे सचिन भोसलेंनी पुष्पा स्टाईलमध्ये डान्स करून पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या पुलावरून मोठमोठे ट्रक वगैरे जातात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. पुलाला फुटपाथ नाही. महिला, शाळकरी त्या पुलावरून जातात, त्यामुळे पालिकेने तातडीने लक्ष द्यावं, अशी मागणी आता होत आहे.

Bhandara Rain : भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाचा धान उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांना जबर फटका

Bhandara Rain : लाखांदूर कृषी उत्पादन बाजार समितीमधील हजारो क्विंटल धान पावसात भिजलं आहे, यामुळे या धानाला योग्य दर मिळणार नसल्याने ते सुकवण्याची धडपड आता सुरू आहे. काल रात्री आलेल्या मान्सूनपूर्व पावसाचा शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना जबर फटका बसला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे काल वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. बाजार समिती व्यवस्थापनानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या धान सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं उपाययोजना केली नसल्यानं हा धानसाठा ओला झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या वादळी वाऱ्याने परिसरातील अनेक झाडं उन्मळून पडली आहेत.

Beed : सकल ओबीसी समाजाकडून आज परळी बंदचं आवाहन

Beed : भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर आज बीडच्या परळी येथे बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे.सकल ओबीसी समाजाकडून हा बंद पुकारण्यात आला असून याबाबतचे निवेदन काल परळी शहर पोलीस ठाण्यात देण्यात आलं होतं. काल बीडमधील शिरुर कासार येथेही याच कारणास्तव बंद पुकारण्यात आला होता. उद्या, म्हणजेच सोमवारी जिल्ह्यातील वडवणी येथेही बंद असणार आहे.

Nanded Accident : सावरी घाटात ट्रक आणि मोटारसायकलची धडक; 1 मृत्यू, 1 जखमी

Nanded : नांदेड ते किनवट जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सावरी घाटामध्ये मोटार सायकल आणि ट्रकचा विचित्र अपघात झाला. ट्रक चालकाने मोटार सायकल एक ते दिड किलोमीटर फरफटत नेल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 9 वाचताच्या सुमारास घडली. या विचित्र अपघातात मरण पावलेला आणि गंभीर जखमी झालेल्याची अद्याप ओळख पटली नाही.

Ratnagiri : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल

Ratnagiri Rain : रायगड आणि रत्नागिरी लोकसभा मतदार संघाच्या दोन्ही जागा गमावल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा कार्यकारणीत फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हाप्रमुख सचिन कदम यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्यावर स्थानिक स्तरावर प्रचंड नाराजी होती. यानंतर आता दापोली मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांची उत्तर रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भास्कर जाधव आणि सचिन कदम यांच्यातला वाद सचिन कदम यांना भोवल्याचं आता म्हटलं जात आहे.

Ratnagiri Rain : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणखी एक ठिकाणी मोरी खचली

Ratnagiri Rain :  पहिल्याच पावसात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला फटका बसला आहे. लांजा तालुक्यातील वाकेड इथे मोरी खचली. मुंबई-गोवा महामार्गावरील मोऱ्यांची कामं निकृष्ट दर्जाची आढळली आहेत. मोरी खचल्याने वाहनं आपटून बंपरचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय. लांजा तालुक्यातील वाकेड गावातले ग्रामस्थ रस्त्यावर उभे राहून वाहन चालकांना मोरी खचल्याच्या सूचना करत आहेत.

Wardha Rain : वर्ध्यातील कारंजा तालुक्यात जोरदार पाऊस; विजेच्या कडकडाटासह वादळी वारा

Wardha Rain : वर्ध्यातील कारंजा घाडगे तालुक्यात विजेच्या कडकडाटसह वादळी वाऱ्यासोबत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कारंजा तालुक्यात धुव्वाधार पाऊस झालाय. या पावसामुळे शेतीच्या कामाची लगबग सुरू होणार असून उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित झालेला होता.

Narendra Modi Oath Ceremony : मॉरीशस पीएम, मालदीवचे राष्ट्रपती दिल्लीत दाखल

Narendra Modi Oath Ceremony Live Updates:  मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ दिल्लीत पोहोचले आहेत. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइज्जूही दिल्लीत आले आहेत. नरेंद्र मोदींच्या शपथविधीला दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी संभाव्य मंत्रिमंडळाशी चहापानावर चर्चा करणार आहेत.

Kolhapur Rain : कोल्हापुरात धुवांधार पाऊस

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हंबरवाडी-बेरडवाडी रोडवर ओढ्यातून म्हैस वाहून गेली. ओढ्याजवळील ट्रॅक्टर आणि ट्रॉली देखील बांधून ठेवायची वेळ आली आहे. आजही कोल्हापुरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Kokan Rain : सिंधुदुर्गात आज रेड अलर्ट

Kokan Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. मात्र आता जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. सिंधुदुर्गात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती कारवाई घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. समुद्रात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छिमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा देखील देण्यात आलेला आहे. 

Rain : देवगड - पहिल्याच पावसाने रस्ता वाहून गेला

Rain , सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील मोंड गावात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भैरवी मंदिर ते नंदीची घाटी बाजारपेठ रस्ता पहिल्याच पावसाने वाहून गेला आहे. पाऊस आला धावून रस्ता गेला वाहून अशी स्थिती मोंड गावतील या रस्त्यांची झाली आहे. सुमारे २०० ते ३०० मीटर वाहून गेला आहे. या वर्षी जलजीवन मिशन कामाची पाईप लाईन रस्त्याच्या कडेने गटारातून खोदाई करून टाकण्यात आली. मात्र  ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने यावर मार्ग काढला नाही तर ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Sangli Rain : सांगली जिल्ह्यात पडलेल्या दमदार पावसामुळे अग्रणी नदीला पूर

Sangli Rain : सांगली जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे बारमाही कोरडी असणारी अग्रणी नदी वाहती झाली असून अग्रणी नदीला पूर आलाय. तसेच जिल्ह्यातील अनेक ओढे-नाल्यांना देखील पूर आला असून पुलावरून पाणी वाहू लागलं आहे. त्यामुळे अग्रणी नदीच्या बंधार्‍यावरून होणारी वाहतूक देखील ठप्प झालीय. जिल्ह्यातील मिरज, शिराळा, तासगाव, आटपाडी तालुक्यांना देखील मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने शेतीची कामं देखील ठप्प झाले आहेत. 

Pandharpur : विठ्ठल मंदिरात भाविकांच्या निवाऱ्यासाठी उभारला नवीन मंडप

Pandharpur : विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर देवाच्या दारात क्षणभर विसावा घ्यावा आणि आपला आनंद व्यक्त करावा यासाठी मंदिरात आता एक नवीन मंडप मंदिरातील बाजीराव पडसाळी येथे उभारण्यात आला आहे. सध्या मंदिराच्या संवर्धनाचे जे ७३ कोटीचे काम सुरु आहे त्यातच हा मंडप उभारण्यात येत आहे . संपूर्ण अत्याधुनिक पद्धतीने हळव्या वजनाचे लोखंड व पत्र्यांचा वापर करून या मंडपाची उभारणी केली जात आहे. याची उंची मंदिराच्या आकाराला साजेशी ठेवल्याने या ठिकाणी भाविकांना ऊन आणि पावसाचा कोणताही त्रास जाणवणार नाही . 

Sangli : मिरजेत कोयता गॅंगचां रात्री धुमाकूळ तलवार, कोयता, कुऱ्हाड घेऊन गाड्यांची तोडफोड करत दहशत ...

Sangli :  सांगलीतील मिरजेत कोयता गॅंगने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून रात्री तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने कोयता यांनी दहशत निर्माण केलीय. मिरज शहरातील ढेरे गल्ली या ठिकाणी एका कारसह वीस ते पंचवीस दुचाकींची तोडफोड करत नासधूस केली. गेल्या काही दिवसापूर्वी शहरांमध्ये दोन टोळ्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला होता. त्यानंतर एका राजकीय नेत्याच्या पुत्राने दहशत माजवीत एकावर खुनी हल्ला केला होता. याच घटनेचा पलटवार म्हणून विरोधी गँगच्या टोळीने काही मिरज शहरात वाहनांची नासधूस करीत तोडफोड केली. तसेच पोलिसांना नावे सांगितल्यास आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी दिल्यास मारहाण करण्यास देखील धमकी यावेळी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघात

सुसाट चारचाकी गाडीने 5 ते 6 उभ्या दुचाकीला  धडक दिली. यामध्ये दुचाकी गाड्यांचा चुराडा झाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शिवाजीनगर भागातील घटना. या अपघातामध्ये 2 जण किरकोळ जखमी झालेत. चारचाकी गाडी चालवणारे गाडी सोडून पळाले. सुरुवातीला जालना रोडवर एका दुचाकीला उडवलं त्यानंतर शिवाजीनगर मध्येही पाच ते सहा दुचाकीवर चढवली गाडी.

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी आम्हाला आंदोलनावर बसायची गरज नाही : बबनराव तायवाडे

OBC Reservation : मराठा समाजाला आरक्षण लागू करताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, हा शब्द आम्हाला राज्य सरकारने दिला आहे, आतापर्यंत सरकारने दिलेला शब्द पळाला आहे . त्यामुळे आम्ही आश्वस्त असून आम्हाला आंदोलनावर बसायची गरज नाही, असं मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मांडलं आहे.

Maharashtra Rain Update : पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ-मराठवाड्यातही पावसाच्या सरी

Maharashtra Rain Update : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात आज अनेक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात वादळी वाऱ्यांसह सर्वत्र पावसाची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भासाठी आज यलो अलर्ट देण्यात आलाय.

Nanded : गावठी पिस्टल आणि काडतूस बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी केली अटक


Nanded News : गावठी पिस्टल आणि काडतूस बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. वजीराबाद पोलिसांनी ही कारवाई केली,  हिंगोली गेट ब्रीज खाली दोन युवक पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने थांबले असल्याची गुप्त माहिती वजिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर डी वटाणे यांना मिळाली. त्यांच्या पथकाने सापळा रचून शिताफीने दोघांना ताब्यात घेतले. 19 वर्षीय गोपाल चव्हाण आणि 24 वर्षीय शुभम सुर्यवंशी यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडून 2 पिस्तूल आणि 3 काडतूस जप्त करण्यात आल्या. दरम्यान त्यांना पिस्टल विक्री करणाऱ्या  मनोज मोरे यांला देखील ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्टल आणि कडेही पिस्तूल जप्त करण्यात आली.  या तिघांकडून तीन पिस्तूल आणि 5 गोळ्या वजिराबाद पोलिसांनी जप्त केल्या.


Kokan Rains : सिंधुदुर्गासाठी आज रेड अलर्ट; राज्यात चार दिवस कोसळधारा

Kokan Rains : राज्यात पुढील तीन-चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे, सोबतच सरासरी 50-60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट आहे, ज्यात 100 मिमीहून अधिक पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो. सिंधुदुर्गासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Vasai Rains : पहिल्याच पावसात मुंबई-अहमदाबाद महामार्ग खचला

Vasai Rains : वसई हद्दीतील मालजीपाडा परिसरातील जे के टायर शो रूमजवळ पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असल्याने हा महामार्ग खचला आहे. खचलेल्या रस्त्यावर वाहनांचे टायर अडकल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. महामार्ग पोलिसांकडून वाहन बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे.

Manoj Jarange Patil :  मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस 

Manoj Jarange Patil, Maratha Aarakshan :  जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी  सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान सरकारकडून अद्याप त्यांच्या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नसून मनोज जरांगे हे सरकारकडून अंमलबजावणी होईपर्यंत आमरण उपोषणवर ठाम आहेत.  

Rain : कल्याण-डोंबिवलीत पावसाची हजेरी

Rain : कल्याण-डोंबिवलीत उकाड्यामुळे हैराण झालेले नागरिक मान्सूनची प्रतीक्षा करत होते. आज पहाटे तासभर कल्याण-डोंबिवलीत पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर रिमझिम पाऊस सुरू होता. अधुनमधून पावसाची जोरदार सर कोसळत होती, पावसाला जोर नसला तरी रिमझिम पावासामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. सकाळी पावसाने उघडीप घेतली आहे.

Pune Megablock : पुणे-लोणावळ्यादरम्यान आज मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द

Pune Megablock :  देखभाल-सुरक्षिततेसाठी तसेच अभियांत्रिकी कार्यासाठी पुणे-लोणावळ्यादरम्यान आज मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. कामशेत-तळेगाव दरम्यान असलेल्या पुलावर लोखंडी गर्डरच्या ठिकाणी एकूण 6 आरसीसी सेगमेंटल बॉक्स बसवण्याच्या कामासाठी आज मेगाब्लॉक घेतला जात आहे.



ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द 


लोणावळा-पुणे लोकल गाडी क्र. 01561
लोणावळा-शिवाजीनगर-गाडी क्र.01563- पुणे-लोणावळा गाडी क्र . ⁠01566
शिवाजी नगर-तळेगाव गाडी क्र. 01588- तळेगाव-पुणे गाडी क्र. 01589


त्याचबरोबर 


-मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस
-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस
-मुंबई-पुणे डेक्कन क्विन सुपरफास्ट एक्स्प्रेस 
-पुणे-मुंबई डेक्कन क्विन सुपरफास्ट एक्स्प्रेस 


या चार एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Mumbai Rains : मुंबई, ठाणे, रायगड परिसरात विजांच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज

Mumbai Rains : मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात मध्यम आणि मोठ्या सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागात विजेच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज आहे. तशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असल्याने घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षण पुन्हा पेटणार..! जरांगे पाटील यांच्या उपोषणाला नांदेडमधून मोठा प्रतिसाद

Manoj Jarange Patil, Maratha Aarakshan : लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे  उपोषण सुरू केलंय. जरांगे यांच्या आंदोलनाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात अमरण उपोषणाला सुरुवात झालीये. नांदेड तालुक्यातील सायाळ, वरखड, वाघी, मरळक, यासह पंचक्रोशीतील नागरिक या उपोषणात सागभागी झाले आहेत. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत असल्याने मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचं आव्हान राज्यसरकार समोर उभं ठाकलं आहे.

Mumbai Rains : मुंबईत पावसाची संततधार; पुढील 3-4 तास पाऊस बरसण्याची शक्यता

Mumbai Rains : पहाटेपासून मुंबईत ठिकठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबईत पावसाची संततधार सुरुच आहे. पुढील 3-4 तास मुंबईत पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Mumbai Mega Block News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, गरज असेल तरच घराबाहेर पडा

Mumbai Mega Block News :  आज लोकल प्रवासाचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे वीकेंडला घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा आणि नियोजन करुनच घराबाहेर पडा. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत लोकल ट्रेन विलंबाने धावतील.

Mumbai Rain :  वसई विरारमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग

Mumbai Rain :  वसई-विरारमध्ये आज पहाटेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली होती.या पहिल्याच पावसात सखल भागातील रस्त्यावर पाणी साचलं होतं.  वसईच्या  साईनगर, विश्वकर्मा नगर, समता नगर, दिवानमान, माणिकपूर रोड येथे पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचलं आहे. पालिकेने नालेसफाईचा दावा केला असला तरी पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचू लागल्याने पालिकेचा दावा फोल ठरला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी आभाळ भरलेलं आहे.

Mumbai Local Update : रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे लोकलवर परिणाम

Mumbai Local Update : मध्य रेल्वेवरील लोकल 5 ते 10 मिनिटं उशिराने धावत आहे. अंबरनाथ दरम्यान सिग्नल बिघाड झाल्याने आणि सर्वत्र रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे लोकलवर परिणाम झाला आहे. तुर्तास सिग्नलमध्ये झालेला तांत्रिक बिघाड मध्य रेल्वेकडून दुरुस्त करण्यात आला आहे.

PM Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार

PM Modi Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा आज शपथविधी होणार आहे. संध्याकाळी 7.15 वाजता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदी सरकार 3.0 च्या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. नियमांनुसार मंत्रिमंडळात 78 मंत्री असतात. आज 40 ते 45 मंत्रि शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्यातील 12 जणांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएमओ कार्यालयातून आज सकाळी नव्या मंत्राना फोन जाणार आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा आज शपथविधी होणार आहे. संध्याकाळी 7.15 वाजता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यासोबतच राज्यातील विविध ठिकाणी आज पावसाच्या सरी कोसळतील. मुंबई, पुण्यासह राज्यभरात आज वरुणराजा बरसेल. या सर्व घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या घटनांची संपूर्ण माहिती मिळवा एका क्लिकवर...   

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.