मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या एक दिवस अगोदर भाजप नेते विनोद तावडे (Vinod tawade) यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला होता. विरार-नालासोपारामध्ये भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात वाद झाला. विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांच्याकडून करण्यात आला होता. विवांत हॉटेलमध्ये भाजपचे (BJP) उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. येथील हॉटेलमध्ये बैठक सुरू असताना, बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. त्यानंतर, बविआकडून पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला, विशेष म्हणजे याठिकाणी रोख रक्कमही जप्त करण्यात आली होती. त्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. तर, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता, विनोद तावडे यांनी याप्रकरणी काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावली आहे. माफी मागा, अन्यथा 100 कोटी रुपयांचा दावा ठोकणार असल्याचं तावडे यांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे.  


विरार येथील हॉटेल विवांतमध्ये घडलेल्या प्रकरणावर विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली होती. मी इथल्या कार्यकर्त्यांना मतदानासंदर्भात माहिती द्यायला आलो होतो. बहुजन विकास आघाडीच्या लोकांचा गैरसमज झाला, की मी पैसे आणले. त्यांनी सगळं तपासलं पण काहीच पैसे मिळाले नाही, त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासावे. सगळं गैरसमजातून झालं, असं विनोद तावडे यांनी म्हटलं होतं. तर, विनोद तावडे 5 कोटी रुपये घेऊन येतायत हे भाजपवाल्यांनीच मला सांगितलं. मला वाटलं विनोद तावडे राजकीय नेते आहेत, हे असं छोटं काम करणार नाही. मात्र आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आले तेव्हा ते हॉटेलमध्ये पैसे वाटत होते, असा गौप्यस्फोट हितेंद्र ठाकूर यांनी केला. विशेष म्हणजे यावेळी हॉटेलमधील सीसीटीव्ही बंद होता. आम्ही आल्यानंतर सीसीटीव्ही चालू केला. हॉटेल मालकांनी असं का केलं, हे त्यांनाच विचारा...सीसीटीव्ही बंद केला, त्यामुळे हॉटेल मालकावर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी देखील मागणी हितेंद्र ठाकूर यांनी होती. 


विरार हॉटेलमधील घटनेनंतर काँग्रेस नेत्यांनी ट्विटरवरुन व सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपवर सडकून टीका केली होती. त्यामुळे, विनोद तावडे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. बिनशर्त माफी मागा, नाहीतर 100 कोटींचा दावा ठोकू, असा इशाराच तावडे यांनी विरार प्रकरणावरुन दिला आहे. त्यामध्ये, लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेट यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील 24 तासांत बिनशर्त माफीचा पर्याय विनोद तावडेंकडून देण्यात आला आहे. अन्यथा, 100 कोटींची मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं तावडे यांनी म्हटलंय. तावडे यांनी आपल्या नोटीसमध्ये त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टचा उल्लेख करत आपली नाहक बदनामी झाल्याचं म्हटलं आहे. तसेच, मी 5 कोटी रुपये वाटल्याचे आरोप बिनबुडाचे असल्याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. 




विनोद तावडेंचे मला 25 फोन


5 कोटी रुपये घेऊन विनोद तावडे आले होते. तसेच दोन डायऱ्या देखील सापडल्या आहेत. यामध्ये पैशांचं वाटप कसं केलं, याची माहिती होती. याबाबत सदर ठिकाणी पोलीस पोहचले आहेत. आम्ही तक्रार केली आहे. परंतु पुढे काय होणार या तक्रारीचं हे माहिती आहे. याचं सरकार आहे, असं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. तसेच, त्याचप्रमाणे मला विनोद तावडे मला सारखे फोन करतायत. मला सोडवा..माझी चूक झाली..मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत आहेत. विनोद तावडे यांनी मला 25 फोन केले आहेत, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.


हेही वाचा


Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी