मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी मतदान होत आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक,  लातूर-उस्मानाबाद- बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा यामध्ये समावेश आहे.


कोकणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचा मुलगा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे कोकणात त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर लातूर-बीड-उस्मानाबाद या जागेसाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यात चुरस असेल.

या निवडणुकीत महापालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, नगरपरिषदेचे सदस्य, नगरपंचायतीचे सदस्य मतदान करतात.

बीड-लातूर-उस्मानाबाद

लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात आहे. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे.

या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे.

राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली.

त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे  यांना पाठिंबा द्यावा लागला.

या तीन जिह्ल्यात मिळून एकूण 1006 मतदार आहेत. यापैकी काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिळून 527, 94 अपक्ष, शिवसेनेचे 64 आणि भाजपचे 321 मतदार आहेत. त्यामुळे भाजप मतांचं गणित कसं जुळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकूण 1006 मतदार

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस 527

शिवसेना - 64

भाजप - 321

अपक्ष - 94

परभणी-हिंगोली

परभणी-हिंगोली विधानपरिषदेच्या जागेसाठी दोन्ही जिल्ह्यातील सात केंद्रांवर 501 मतदार मतदान करतील. हे 501 मतदार निवडणुकीच्या मैदानात असलेल्या तीन उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत. शिवसेनेकडून विप्लव बाजोरिया, तर काँग्रेसकडून माजी आमदार सुरेश देशमुख यांच्यात मुख्य लढत आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार सुरेश नागरेही मैदानात आहेत.

एकूण 501 मतदार

राष्ट्रवादी 162

काँग्रेस 135

भाजप 51

शिवसेना 97

रासप 7

मनसे 5

एमआयएम 1

अपक्ष 43

अमरावती

अमरावती जिल्ह्यातील 489 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील तहसील कार्यालय स्तरावर एकूण 14 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये महानगरपालिकेचे 92 सदस्य, जिल्हा परिषदेचे 59, पंचायत समित्यांचे सभापती 14, नगर परिषद 249, नगर पंचायतचे 75, असे एकूण 489 सदस्य आहेत. या निवडणुकीत भाजपचे प्रवीण पोटे, तर काँग्रेसचे अनिल माधोगढीया या दोघांमध्ये चुरस आहे.

भाजपाने आपल्याकडे 262 सदस्य असल्याचा दावा केला आहे, तर काँग्रेसने 227 मतदार असल्याचा दावा केला. सोबतच भाजपची संख्या जास्त असली तरी भाजपच्या गटातील काही सदस्य आमच्याकडे येतील, असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला.

एकूण 489 मतदार

भाजपा - 200

काँग्रेस - 128

राष्ट्रवादी - 40

शिवसेना - 28

प्रहार - 18

एमआयएम - 14

युवा स्वाभिमान पार्टी - 13

बसपा - 6

अपक्ष - 33

रिपाई - 4

सपा - 1

मनसे - 2

लढा - 1

स्वाभिमानी शे.सं. - 1

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीत काँग्रेसकडून इंद्रकुमार सराफ हे उमेदवार आहेत, तर भाजपकडून रामदास आंबटकर हे लढत आहे. दोन्ही पक्षात हेवे-दावे आणि नाराजीचा फायदा आम्हालाच होणार, असा दावा दोन्ही उमेदवार करत आहेत. त्यामुळे अंतर्गत कलह आणि विरोध पाहता मतदार कोणाला मतदान करून पारडं जड करतील, याकडे लक्ष लागलं आहे.

भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. रामदास आंबटकर हे अनके वर्षांपासून पक्षात काम करत असल्याने त्यांच्या पाठीशी पक्ष उभा असल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसचे उमेदवार ऐन वेळी इंद्रकुमार सराफ यांना निवडणूक उमेदवारी जाहीर झाली. यामुळे यात पूर्व तयारी नसल्याचं चित्र दिसून आलं. यामुळे काही काळ बंडखोरी झाल्याने संभ्रम निर्माण झाला होता. सराफ हे बंडखोरांचे समर्थन मिळवण्यात यशस्वी झाले खरे, पण प्रत्यक्षात मतपेटीत किती मतदान स्वतःच्या पदरात पाडून घेतील, याकड सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उमेदवाराला विजय मिळवण्यासाठी 530 च्या घरात मतांची गरज आहे. यात भाजपकडे स्वतःचे 500 च्या घरात मतं आहेत, तर काँग्रेसकडे 300 च्या आसपास मतदार आहेत. त्यामुळे काँग्रेसला जुळवाजुळवी ही अधिक करावी लागणार यात शंका नाही.

पक्षनिहाय संख्याबळ

एकूण मतदार संख्या - 1049

भाजपा -  495

शेतकरी संघटना -  53

काँग्रेस -  260

राष्ट्रवादी काँग्रेस -  79

बहुजन समाज पार्टी - 18

मनसे - 2

सीपीआय - 2

इतर - 15

अपक्ष - 54.

वर्धा 308, चंद्रपूर 469, गडचिरोली 282 मतदार

नाशिकमध्ये भाजपची राष्ट्रवादीला साथ?

नाशिकमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत असल्याने निवडणूक चुरशीची ठरली आहे. शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे शिवाजी सहाणे आणि अपक्ष परवेज कोकणी हे तिघे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्यातील दोन महानगरपालिकांसह जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायतचे सदस्य आणि पंचायत समिती सभापती असे एकूण 644 मतदार आहेत.

जिल्ह्यातील 15 मतदान केंद्रांवर मतदान होईल. ग्रामीण भागातील सदस्यांना तहसील कार्यालयात, तर नाशिक शहरातील मतदारांना जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान करता येणार आहे.

शिवसेनेचे सर्वधिक 207 मतदार आहेत. त्या पाठोपाठ भाजपचे 167, राष्ट्रवादी काँग्रेसचे 100, काँग्रेस 71, मनसे 6, आरपीआय 5 अपक्ष 38 आणि इतर 50 असं पक्षीय बलाबल आहे. अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांची मते कोणाच्या पारड्यात मत टाकतात त्याचा विजयाचा मार्ग सुकर होणार आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी भाजपच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे विधानपरिषदेत शिवसेनेला धोबीपछाड देण्याची रणनीती भाजपने आखली आहे. परिणामी सर्वाधिक सदस्य संख्या असूनही शिवसेनेचा प्रवास खडतर दिसतोय. शिवसेनेच्या उमेदवाराने ग्रामीण भागात आपली सगळी ताकद पणाला लावली असल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. फोडाफोडीच्या राजकारणावर निवडणुकीचं गणित अवलंबून असल्याने स्वतःचे मतदार संभाळून इतरांच्या फोडाफोडीवर भर दिला जात आहे.

एकूण 644 मतदार

भाजप - 167

शिवसेना - 207

राष्ट्रवादी काँग्रेस- 100

काँग्रेस - 71

मनसे - 6

आरपीआय- 5

अपक्ष - 38

इतर- 50

कोकणात सुनील तटकरेंची प्रतिष्ठा पणाला

रायगड-सिंधुदुर्ग-रत्नागिरी या तीन जिल्ह्यातील 940 मतदार कोकणचा आमदार निश्चित करणार आहेत. यापूर्वी ,कोकणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधानपरिषदेचे आमदार म्हणून सुनील तटकरे यांचे थोरले बंधू अनिल तटकरे निवडून आले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून दोघा भावांमध्ये धुसफूस सुरु असून यंदा या निवडणुकीसाठी सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, कोकणच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यामध्ये थेट निवडणूक होणार आहे.

राजीव साबळे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. तर, कोकणच्या या निवडणुकीमध्ये दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार हे रायगड जिल्ह्यातील असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मनसे आघाडी करण्यात आली आहे. तर नारायण राणे यांनी देखील अनिकेत तटकरे यांना पाठिंबा दिला आहे.

यामुळे शिवसेनेला भाजपची साथ मिळणार, की एकाकी पडणार याकडे लक्ष लागलं असून मुलाच्या या पहिल्यावहिल्या निवडणुकीसाठी सुनील तटकरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

एकूण मतदार 941 (एक जागा रिक्त)


शिवसेना  293

भाजपा  164

राष्ट्रवादी  174

काँग्रेस 69

शेकाप 92

स्वाभिमान 98

मनसे 12

अपक्ष 03

आरपीआय 24

ग्रा.विकास आ. 10

विधानपरिषद निवडणूक 2018 : कोणाविरुद्ध कोण?

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग   -  अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)  विरुद्ध राजीव साबळे  (शिवसेना)

नाशिक - नरेंद्र दराडे (शिवसेना) विरुद्ध  शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी)

परभणी-हिंगोली -  विप्लव बजोरिया (शिवसेना) विरुद्ध सुरेश देशमुख (काँग्रेस)

उस्मानाबाद-लातूर-बीड - सुरेश धस (भाजप) विरुद्ध  अशोक जगदाळे (अपक्ष) - राष्ट्रवादीचा पाठिंबा

अमरावती -  प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध  अनिल मधोगरिया  (काँग्रेस)

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली - इंद्रकुमार सराफ (काँग्रेस)  विरुद्ध रामदास अंबटकर (भाजप)

21 मे रोजी मतदान, 24 मे रोजी निकाल

स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख होती.

21 मे रोजी म्हणजेच आज  मतदान , तर 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.

या आमदारांचा कार्यकाळ संपणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग)

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव (नाशिक)

राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली)

काँग्रेसचे दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड)

भाजपचे प्रवीण पोटे (अमरावती)

भाजपचे मितेश भांगडिया (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली)

संबंधित बातम्या :

कोकण विधानपरिषदेत शिवसेना विरुद्ध राणे विरुद्ध तटकरे 

रमेश कराड तोडपाणी करण्यात कमी पडले असावे : सुरेश धस  

पंकजांचा मास्टरस्ट्रोक, रमेश कराड यांचा अर्ज मागे!  

विधानपरिषदेसाठी शिवसेनेचा तिसरा उमेदवारही जाहीर 

सेना-भाजपचं पुन्हा 'तुझं माझं जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना'