औरंगाबाद : विधानपरिषद निवडणुकीत बीड नगर परिषदेच्या दहा निलंबित सदस्यांना मतदान करता येणार आहे. मात्र त्यांची मतं वेगळी ठेवण्याचा निर्णय हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. पहिल्या आणि दुसऱ्या उमेदवारांचा फरक 10 पेक्षा जास्त असेल तर निकाल द्यावा, फरक कमी असेल तर निकाल राखीव ठेवण्यात यावा, असे आदेश कोर्टाने दिले.
या प्रकरणासाठी कोर्टाचं कामकाज रविवारीही सुरु होतं.
पालिकेत कचरा टाकल्यामुळे दहा सदस्य निलंबित
बीड नगर परिषदेच्या दहा सदस्यांना पालिकेत कचरा टाकला म्हणून राज्यमंत्री रणजित पाटील यांनी अपात्र ठरवलं. निवडणूक आयोगाने मात्र त्यांना मतपत्रिका यापूर्वी तयार झालेल्या असल्याने मतदानाचा अधिकार दिलेला आहे.
राज्यमंत्र्यांचे आदेश रद्द करण्यासाठी बीड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्यासह नऊ अपात्र घोषित नगरसेवकांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. शिवाय याविरोधात दुसरीही एक याचिका दाखल करण्यात आली होती.
खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी दहा अपात्र नगरसेवकांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सोमवारी भाग घेण्यास परवानगी दिली. या दहा नगरसेवकरांच्या मतांचा निवडणुकीवर परिणाम होत असेल, तर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येऊ नये. निवडणुकीचा निर्णय याचिकेच्या अंतिम निकालास अधीन राहील, असं स्पष्ट करण्यात आलं.
बीड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष हेमंत रविंद्र क्षीरसागर, प्रभाकर पोकळे, सय्यद फारूख, युवराज जगताप, रमेश चव्हाण, अमर नाईकवाडे, सम्राटसिंह चव्हाण, हाश्मी इद्रीस, मोमीन अझरोद्दीन आणि रणजीत बनसोडे यांनी नगराध्यक्षांच्या दालनात कचरा टाकल्याने त्यांना अपात्र घोषित करण्यात आलं होतं.
निर्णयाला हायकोर्टात आव्हान
याविरोधात अॅड. सतीश तळेकर यांच्यावतीने खंडपीठात आव्हान देण्यात आलं. राज्यमंत्र्यांचा निर्णय रद्द करण्यात यावा आणि तूर्तास त्याला स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली होती. मतदार यादी 3 मे 2018 रोजी अंतिम झाली आणि निवडणूक प्रक्रियेला 20 एप्रिल 2018 पासून सुरूवात झाली.
एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यास त्यात हस्तक्षेप केला जाऊ नये, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे.
दुसऱ्या याचिकेत निवडणूक आयोगाने मतदान करण्यास दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. राज्यमंत्र्यांच्या अपात्रतेच्या 18 मे रोजीच्या आदेशाची प्रत 19 मे रोजी सायंकाळी मिळाली असल्याचं अॅड. तळेकर यांनी सांगितलं. यावर सुनावणी करताना कोर्टाने या दहा नगरसेवकांची मतं वेगळी ठेवण्याचा निर्णय दिला.
विधानपरिषदेसाठी आज मतदान
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, लातूर-उस्मानाबाद- बीड, परभणी-हिंगोली, अमरावती, आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा समावेश आहे.
बीडमध्ये प्रतिष्ठेची लढत
लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात आहे. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे.
या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे.
राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली.
त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला.
संबंधित बातम्या
कोकण विधानपरिषदेत शिवसेना विरुद्ध राणे विरुद्ध तटकरे
रमेश कराड तोडपाणी करण्यात कमी पडले असावे : सुरेश धस
पंकजांचा मास्टरस्ट्रोक, रमेश कराड यांचा अर्ज मागे!
विधानपरिषदेसाठी शिवसेनेचा तिसरा उमेदवारही जाहीर
सेना-भाजपचं पुन्हा 'तुझं माझं जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना'
बीडच्या दहा निलंबित नगरसेवकांना मतदान करता येणार, पण...
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
21 May 2018 09:22 AM (IST)
पहिल्या आणि दुसऱ्या उमेदवारांचा फरक 10 पेक्षा जास्त असेल तर निकाल द्यावा, फरक कमी असेल तर निकाल राखीव ठेवण्यात यावा, असे आदेश कोर्टाने दिले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -