लातूर : बळीराजा कायमच शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन आणि शेळीपालनाचा व्यवसाय करत आला आहे. अनेक तरुण शेतकरी दिवसेंदिवस हा व्यवसाय वाढवत आहेत मात्र, बर्डफ्लूने कुक्कुटपालन व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता शेळ्याही अज्ञात रोगाने बळी पडत असल्याचे समोर आल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड येथील शेतकऱ्याच्या 9 शेळ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कोंबड्या पाठोपाठ आता शेळ्या दगावत असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. शेतकरी मधुकर बेळंबे यांच्या नऊ शेळ्या काल संध्याकाळी एकामागोमाग एक दगावत गेल्या. त्यांच्या नऊ शेळ्या अवघ्या काही तासात मृत्युमुखी पडल्यामुळे यात त्यांचे 1 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. तहसीलदार गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी व मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शेळ्या नेमक्या कोणत्या कारणामुळे दगावल्या आहेत याची माहिती अद्याप समोर आली नाही. जिल्ह्यातील तीन तालुक्यात बर्ड फ्लूचा संसर्ग वाढलेलं असताना अचानकपणे शेळ्या दगावत असल्याने संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.


का वाढली भीती?
कोरोनाचे संकट टळत असतानाच आता बर्डफ्लू सारख्या रोगाचा सामना व्यावसायिकांना करावा लागत आहे. आठ दिवसांपूर्वी अहमदपूर तालुक्यातील तब्बल 300 कोंबड्या बर्डफ्लूने दगावल्या होत्या. तर आता औसा तालुक्यातील 280 व उदगीर तालुक्यातील 11 कोंबड्या दगवल्या आहेत. त्यानंतर प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून 10 हजारांपेक्षा जास्त कोंबड्या नष्ट केल्या आहेत.


शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आता कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीला या कुक्कुटपालनाने आणि शेळीपालनाने मोठा आधार मिळाला होता. मात्र बर्ड फ्लू मुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित बिघडले आहे. यातच आता रामलिंग मुदगड येथे शेळ्या दगावल्या आहेत. यामुळे बर्ड फ्लू शेळ्यामध्ये तर आला नाही ना? अशी शंका शेतकरी वर्गात उपस्थित केली जात आहे.


बर्ड फ्लूमुळे चिकन आणि अंड्यांचे दर कोसळले आहेत. खाद्यप्रेमी चिकन अंड्यांऐवजी व्हेजकडे वळल्याने व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. आता शेळ्याही दगावत असल्याने मटण प्रेमीही थोडे धास्तावले आहेत.