नवी दिल्ली : आज देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ झाला. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लसीकरण मोहिमेचं उद्घाटन झालं. कोरोना योद्ध्यांना लस देत ही मोहिम सुरु झाली. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे, येत्या टप्प्यात ही संख्या 30 कोटींवर नेण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तर लसीकरणाच्या रुपात आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला उपस्थिती लावत लसीकरणाचा शुभारंभ केला.


पंतप्रधान काय म्हणाले?
पंतप्रधान मोदी म्हणाले की, लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक असून त्यानंतर दोन आठवड्यानंतर शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये आवश्यक बदल होतील, असंही त्यांनी सांगितलं. 'दवाई भी, कड़ाई भी', असा नवीन नारा यावेळी मोदींनी दिला. तसंच कोरोना लसीकरणानंतरही मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिक आणि लस विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. "गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना लस बनवण्यात व्यस्त असलेले वैज्ञानिक, लस बनवणारे कर्मचारी कौतुकासाठी पात्र आहेत. सामान्यत: एक लस बनण्यासाठी अनेक वर्षे लागतात. पण एवढ्या कमी वेळात एक नाही तर दोन मेड इन इंडिया लस बनवल्या," असं मोदी म्हणाले. कोरोना लसीचे दोन डोस घेणं आवश्यक असल्याचं सांगताना मोदी म्हणाले की, "मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की, कोरोना लसीचे दोन डोस घेणं गरजेचं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये जवळपास एक महिन्याचं अंतर अले. दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यानंतरच तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीत आवश्यक बदल होणार आहेत."


मुख्यमंत्री म्हणाले, सावधगिरीमध्ये हलगर्जीपणा नको...
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला उपस्थिती लावत लसीकरणाचा शुभारंभ केला. यावेळी लसीकरणाच्या रुपात आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत असं म्हणत त्यांनी एका नव्या आणि सकारात्मक उर्जेनं जनतेला संबोधित केलं.कोरोना काळात सुरुवातीच्या दिवसांमध्ये या संसर्गानं ज्या प्रकारे थैमान घातलं होतं, ते दिवस आठवताना या दिवसांमध्ये रुग्णांची सेवा करणाऱ्या प्रत्येक कोविड योद्ध्याला मुख्यमंत्र्यांनी मानाचा मुजरा केला. कोरोना काळात मोलाचं सहकार्य देणाऱ्या टास्क फोर्स टीममधील डॉक्टरांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आरोग्य व्यवस्थेचा भक्कम आधार, म्हणून केला. कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये परिस्थिती किती बिकट होती, हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी लसीचा शुभारंभ झाल्याचा आनंद वयक्त केला. यावेळी संकट अजूनही टळलेलं नाही, असं म्हणत त्यांनी जनतेला सावधगिरीचा इशारा दिला. सध्या आपल्या हाताशी लस आली असली तरीही ती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी काही दिवस आणि महिन्यांचा कालावधी लागणार असून, त्याचा प्रभावही किती दिवसांसाठी राहणार हेसुद्धा येत्या दिवसांतच स्पष्ट होणार असल्याचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी सर्वांपुढे स्पष्टपणे मांडला. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस मिळाली असली तरीही सर्वात उत्तम लस म्हणजे तोंडावर असणारा मास्क, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मास्कचं महत्त्वं पुन्हा एकदा पटवून देत मास्कला अंतर देणं योग्य नसल्याचं सांगितलं. पंतप्रधानांनी ज्याप्रमाणं लसीच्या वापरानंतरही मास्कच्या वापरावर भर दिला, त्याचप्रमाणं मुख्यमंत्र्यांनीही कोरोनाचं संकट टाळण्यासाठी मास्कच्या वापराला प्राधान्य दिलं.


देशातील पहिली लस सफाई कामगार मनीष यांना
राजधानी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये देशातील कोरोनाची पहिली लस एका आरोग्य कर्मचाऱ्याला टोचली गेली. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन उपस्थित होते. सफाई कामगार असलेल्या मनीष यांनी लस घेतल्यानंतर सांगितलं की, माझा अनुभव खूप चांगला होता. लस घेताना मला काहीही अडचण आली नाही. लोकांनी घाबरुन जाऊ नये. माझ्या मनात जी भीती होती ती देखील निघून गेली आहे. सर्वांनी लस घ्यावी, असं मनीष कुमार यांनी म्हटलं.


दुसऱ्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा मानस 
इतिहासात कधीही अशाप्रकारचं आणि एवढ्या मोठ्या स्तरावर लसीकरण अभियान कधी झालेलं नाही. तीन कोटींपेक्षा कमी लोकसंख्या असलेले 100 पेक्षा जास्त देशत जगात आहेत. तर भारतात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच 3 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ही संख्या 30 कोटींवर नेण्याचा केंद्राचा मानस आहे.


विदेशी लसीच्या तुलनेत भारतीय लस स्वस्त
भारतीय लस, विदेशी लसींच्या तुलनेत अतिशय स्वस्त असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. तसंच त्यांचा वापरही तितकाच सोपा असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. यावेळी त्यांनी परदेशी आणि भारतीय लसींच्या बनावटीची तुलना केली. साठवणीपासून लसीच्या वाहतुकीपर्यंत देशातील भौगोलिक परिस्थितीलाही लक्षात घेण्यात आल्याचा मुद्दा यावेळी त्यांनी मांडला.


सहा केंद्रांवर भारत बायोटेकची लस


आजपासून सुरू झालेल्या देशव्यापी लसीकरण मोहिमेत बहुतांश ठिकाणी सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोव्हीशील्ड लस वापरली जातेय. मात्र महाराष्ट्रतील अठ्ठावीसशे लसीकरण केंद्रांपैकी फक्त सहा केंद्रं अशी आहेत ज्या ठिकाणी भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली कोव्हॅक्सीन लस दिली जातेय. खरं तर भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सीन लशीच्या दोनच ट्रायल पूर्ण झालेल्या असताना आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल बाकी असताना या लसीला केंद्र सरकारने परवानगी दिली होती.  त्यामुळे आज या लसीद्वारे होणाऱ्या लसीकरणाला तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल म्हणूनही पाहिलं जातंय. परंतु आनंदाची बाब पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात ही लस घेणाऱ्या कोणालाही कसलाही त्रास झालेला नाही.


लसीवरून राजकारण! जगातील राष्ट्रप्रमुखांनी लस घेतली, मग मोदी सरकारमधील नेते मागे का? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल


जगातील राष्ट्रप्रमुखांनी लस घेतली, मग मोदी सरकारमधील नेते मागे का?
एकीकडे लसीकरणाचा कार्यक्रम आज देशात सुरू झाला तर दुसरीकडे विरोधकांनी या कार्यक्रमाबद्दल प्रश्न उपस्थित करत सरकारवर तोफ डागली आहे. या टीकेत सर्वात आघाडीवर काँग्रेस आहे. लसीच्या परवानगीबाबत जी प्रक्रिया पाळायला हवी होती ती न पाळताच सरकार हा कार्यक्रम सुरू करत असल्याची टीका खासदार मनोज तिवारी यांनी केली. शिवाय इतक्या मोठ्या समूहाला लसीकरण होत असेल तर मग अद्याप इमर्जन्सी यूज अथोरायझेशन अशीच परवानगी का आहे हा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


तीन जानेवारीला देशात दोन लसींना एकाच वेळी परवानगी मिळाली. त्यातही ज्या भारत बायोटेक या सरकारी लशीला परवानगी दिली गेली त्यात पुरेसा डेटा उपलब्ध नसतानाच घाई झाल्याचा आरोप विरोधक करत आलेत. विशेष म्हणजे कुठली लस घ्यायची हा पर्याय नागरिकांना उपलब्ध नसणार आहे. त्यात या लसीबद्दल संशय असतानाही सरकार ती का रेटतंय? हा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला आहे. जगातल्या अनेक देशात त्या-त्या राष्ट्र प्रमुखांनी सर्वात आधी लस टोचून घेतली आहे. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी मोदींनीही ते पाऊल उचलावे अशी देखील मागणी विरोधक करत आहेत.