Maharashtra Latur News : लातूर (Latur) शहराला मागील एक महिन्यापासून पिवळसर दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे सर्वसामान्य लातूरकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मनपा प्रशासनास यावर अद्याप उपाय सापडला नाही. अशातच पाण्याबाबत निर्माण झालेल्या या समस्येमुळे लोकांमध्ये रोष वाढत चालला आहे. लातूर शहरात विविध भागांत पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकानुसार, पाणी पुरवठा रोज केला जात असतो. वेगवेगळ्या विभागांत दहा दिवसांच्या फरकानं पाणी पुरवठा केला जातो.


पिवळसर पाणी पुरवठा


लातूर शहराला मांजरा धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. धरणात पाणी मुबलक आहे. दोन दिवसाआड पाणी देता येऊ शकतं, मात्र यंत्रणा सक्षम नसल्यामुळं दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र एक महिन्यापासून पाण्याचा रंग गडद पिवळा होऊ लागला आहे. पाण्याला दुर्गंधीही येऊ लागली आहे. मनपा प्रशासनानं तुरटी आणि इतर केमिकलचे प्रमाण बदलूनही पाहिलं मात्र त्याचा काहीट उपयोग झाला नाही.


मनपाची वेगवेगळी कारणं


मागील एक महिन्यापासून लातूर शहरात होणारा पाणीपुरवठा हा दुषित आणि पिवळसर रंगाचा आहे. महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं वेळोवेळी प्रयत्न केले, मात्र पाण्याचा रंग काही बदलत नाही. त्यामागची कारणं शोधण्याचाही प्रयत्न महानगरपालिका प्रशासनानं केला आहे. मात्र अद्याप पाणी पिवळं का होतं? याचं ठाम कारण महानगरपालिकेकडे नाही.


'या' कारणामुळे पाण्याचा रंग पिवळा


धरणात असलेल्या शेवाळामुळे हे पाणी पिवळं होतं, असं कधी सांगितले जातं. तर कधी पाईपलाईन मधल्या समस्येमुळे पाणी पिवळं होतं असं सांगितलं जातं. एवढंच नाहीतर, शुद्ध पाण्यात धरणात येणारं पाणी मिसळत असल्यामुळं हे होत आहे, असं सांगितलं जात आहे. 
       
पिण्यालायक पाण्यासाठी मनपाचा सल्ला


पाण्याचा पिवळा रंग आणि दुर्गंधी कमी करण्यासाठी अनेक उपाय करून झाले, मात्र उपयोग झाला नाही. तुरटी आणि केमिकलचा वापरही करण्यात आला. त्याचे प्रमाणही वाढवण्यात आलं. मात्र तरीही पाण्याचा पिवळा रंग गेला नाही. मग सरतेशेवटी यातील अभ्यासकांना बोलवण्यात आलं. त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. चर्चेचं फलित काय होतं? यासाठी फेसबुक लाईव्ह करण्यात आलं. त्यात असं स्पष्ट करण्यात आलं की, पाण्यामध्ये पिवळा रंग हा जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाईप लाईनमध्ये पाणी गेल्यानंतर ही होऊ शकतो. पाईप लाईनमध्ये असणाऱ्या समस्येमुळे हे पाणी पिवळं होतं. आणि तुमच्या घरापर्यंत येतं. त्यामुळे त्यावर उपाय करताना पाणी उकळून घ्या. गाळून घ्या. त्यामध्ये तुरटी टाका. मेडिकोरचे चार थेंब टाका आणि मगच पाणी प्या. 


पण आता प्रश्न असा निर्माण होतो की, जलशुद्धीकरण प्रकल्पाची एवढी मोठी यंत्रणा महानगरपालिका राबवते त्याचा उपयोग काय? जर जलशुद्धीकरण प्रकल्पातून येणाऱ्या पाण्यावर एवढ्या प्रक्रिया करून वापरायचं असेल तर ही यंत्रणा काय कामाची? आजमितीला मनपा प्रशासनाकडे कोणताही मार्ग उपलब्ध नाही यातून बाहेर येण्यासाठी कधी काळी लातूर शहर पाणी टंचाईच्या झळा सोसत होते. आज पाणी आहे, मात्र ते पिण्यालायक नाही असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती लातूरकरांची झाली आहे. प्रशासनाकडे यातून बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध नाही. 


काही दिवसांपूर्वी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी हे पाणी पिण्यायोग्य आहे, असं म्हणत पाणी पिऊन दाखवलं होतं. मात्र आज पाणी पिण्यापूर्वी काय करावं याच्या मार्गदर्शक सूचना करण्यात आल्यात यामुळे आता लातूरकर संभ्रमावस्थेत आहे. इतके दिवस महापौर विक्रांत गोजमगुंडे हे खोटे बोलत होते. लोकांच्या जीवाशी खेळत होते का? पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल होता का? पाण्याची तपासणी करण्यात आली होती का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.