Raigad News : रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरून काही महिन्यांपासून राजीनामा नाट्य सुरू आहे. रायगडचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांनी राजीनामा दिल्याने पक्षातील नेत्यांमध्ये चुरस सुरू झाली आहे.
सुनील तटकरेंकडून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी उभारी
रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे हे शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाला मोठी उभारी दिली आहे. याचाच भाग म्हणून कर्जत, पेण आणि श्रीवर्धन मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षीय ताकद वाढविली आहे. तर, दक्षिण रायगडमधील माणगाव , पाली विभागात देखील राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षीय बलाबल वाढविले आहे. त्यातच, शेकापसोबत युतीकरुन आदिती तटकरे यांना जिल्हा परिषद अध्यक्षा बनविण्यात आले होते , तर यानंतर आदिती या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून काम पाहत आहेत. तर, कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवडून आलेले विधान परिषद सदस्य अनिकेत तटकरे हे देखील राजकारणात सक्रिय आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस वाढली
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून नवी मुंबईच्या सिडको अध्यक्षपदासाठी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस वाढली आहे. त्यातच, गेल्या महिनाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेच्या रायगड दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असता सुरेश लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. तर, त्यापूर्वी देखील नगरपंचायत निवडणुकी दरम्यान देखील सुरेश लाड हे नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच, सुनील तटकरे यांनी सुरेश लाड यांच्या नाराजीबाबत चर्चा करून पक्षात कार्यरत राहणार असल्याचे जाहीर केले आहे.
पदासाठी जिल्ह्यातील नेत्यांची रस्सीखेच सुरू
यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदासाठी जिल्ह्यातील नेत्यांची रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये, सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय असलेले विद्यमान कार्याध्यक्ष मधुकर पाटील, माजी जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे, महासचिव प्रशांत पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. दरम्यान, पक्षीय ताकदीचा विचार केल्यास दक्षिण रायगडमध्ये तटकरे कुटुंबियांची ताकद मोठी आहे. तर उत्तर रायगडमध्ये जिल्हायुवक अध्यक्ष अंकित साखरे, महिला अध्यक्षा उमा मुंढे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पाटील अशी तरुण फळी उभी करण्यात आली आहे.
तटकरेंना रायगडवरील ताकद अधिक घट्ट करायचीय
त्यातच, उत्तर रायगडमध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले हनुमंत पिंगळे, गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात असलेले महाराष्ट्र महासचिव प्रशांत पाटील, कर्जत येथील सुधाकर घारे यांच्या नावांची जिल्हाध्यक्ष पदासाठी जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, प्रशांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या दौऱ्यावेळी सिडको अध्यक्षपद देण्याची मागणी व्यासपीठावरून केल्यानंतर आता जिल्हाध्यक्ष पदाच्यासाठीही रणनिती सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा कारभार हा उत्तर रायगडला मिळाल्यास त्याचा अधिकचा फायदा हा मावळ खासदार मतदार संघाला होणार असल्याचे देखील विचार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, सुनील तटकरे यांना रायगडवरील आपली ताकद अधिक घट्ट करायची आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी निवड करताना ते त्यांच्या पसंतीचाच उमेदवार निवडणार हे नक्की.
नेमकी कुणाची वर्णी लागते?
यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगडच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी नेमकी कुणाची वर्णी लागते? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. तर, सुरेश लाड यांना कोणती नवी जबाबदारी मिळणार याचेही औत्सुक्य कार्यकर्त्यांना आहे.