Latur : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त लातुरात बाबासाहेबांच्या भव्यदिव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. लातूरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 70 फूट उंचीचा ‘स्‍टॅच्‍यू ऑफ नॉलेज’ पुतळा उभारण्यात आला आहे. आज संध्याकाळी या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री संजय बनसोडे तसेच केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले भाजपा नेते गिरीश महाजन यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. 


लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या संकल्पनेतून ह्या पुतळ्याच्या उभारणीचा संकल्प करण्यात आला. बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्याचा एक महिन्यांपूर्वी विचार समोर आला होता. कमी कालावधी असल्यामुळे पुतळा उभा करणे हे मोठे आव्हानात्मक काम होते. जवळपास 50 कारागीरांनी 20 दिवस 24 तास काम करत पुतळ्याचे काम पूर्ण करून ही भव्यदिव्य प्रतिमा साकारली आहे. 


70 फुटाचा हा पुतळा उभा करण्यासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाण बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे करण्याचे ठरविण्यात आले. हा पुतळा तयार करण्यासाठी 1400 किलो स्टील,1400 किलो पीओपी, 3570 किलो फायबर आणि 200 लिटर पेंट वापरले गेले आहे.


राज्यातील सर्वात उंच पुतळा म्हणून याची नोंद होणार आहे अशी माहिती खासदार सुधाकर तुकाराम श्रृंगारे यांनी दिली आहे. मोदी सरकारने डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित लंडन आणि नागपूरसह पाच स्थळांचा (पंचतीर्थ) वेगाने विकास केला. त्या प्रेरणेतूनच लातूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा भव्य पुतळा उभारण्याची कल्पना आपण प्रत्यक्षात आणली असेही श्रृंगारे यांनी सांगितले. 


संध्याकाळी पुतळा अनावर करताना मोठी आतिषबाजी करण्यात येणार आहे. तसेच यावेळी लेझर शो आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी आसनव्यवस्था पार्किंगची सोय ही करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातूनच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांची गर्दी होण्याचा अंदाज लक्षात घेऊन वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. 


महत्वाच्या बातम्या : 


Nepal : नेपाळसह संपूर्ण दक्षिण आशियात डॉ.बाबासाहेबांचा प्रभाव; नेपाळच्या राष्ट्रपतींकडून स्मरण