रत्नागिरी : राज्यात मान्सून (Maharashtra Rain Update) दोन दिवस लवकरच दाखल झाला आहे. त्यानंतर काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. पण, याचवेळी कोकणातील (Konkan Rain) रत्नागिरी जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता 10 ते 11 जून दरम्यान कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे असून 10 ते 11 जून या दोन दिवसांमध्ये अति मुसळधार पाऊस कोसळू शकतो. या दोन दिवसामध्ये जवळपास 200 मिलिमीटर पावसाची शक्यता वर्तवली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबतची माहिती ऑनलाईन झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्यासोबत करावयाच्या उपाययोजनांबाबत ऑनलाईन बैठक देखील पार पडली.


जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता एनडीआरएफच्या दोन टीम देखील तैनात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. दरम्यान, परिस्थितीचा सारासार विचार करता दोन दिवस कर्फ्यू लावण्याचा विचार देखील यावेळी जिल्हाधिकारी यांनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे अर्थातच या काळात नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे. सद्यस्थितीत हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजामध्ये काही बदल होतील त्यानुसार सारे निर्णय आगामी काळात घेतले जातील अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. 


Maharashtra Weather Predictions: सतर्क राहा! मुंबईसह राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये चार दिवस अतिवृष्टी, हवामान खात्याचा इशारा 


'3 नगरपालिका आणि गावांना जास्त धोका'


डोंगरामध्ये, खाडी किंवा नदी किनारी असलेली गावं आणि जिल्ह्यातील 3 नगरपालिका यांना यावेळी जास्त धोका आहे. नगरपालिकांमध्ये  खेड, चिपळूण, राजापूर यांचा समावेश आहे. राजापूर तालुक्यातील राजापूर बाजारपेठ, काजिर्डा, डोंगर, बांगरी खुर्द, भाबलेवाडी संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, कसबा, कुर्धंडा, नावडी, म्हासळे, वाशी तर्फ संगमेश्वर, कोळंबे, भडकंबा, पांगरी रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर, हरचेरी, चांदेराई, टेंभे, चिपळूण तालुक्यातील पेठमाप, गोवळकोट, मजरेकाशी, खेर्डी, चिपळूण शहर खेड तालुक्यातील खेड शहर, प्रभुवाडी, चिंचखरी, सुसेरी, अलसुरे आणि गुहगर तालुक्यातील वडद, पालशेत आणि परचुरी ही गावं पुरक्षेत्र प्रवण गावे आहे. त्यामुळे परिस्थितीतीचा अंदाज घेत नागरिकांना सुरक्षित स्थळी देखील हलवले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पूरस्थितीचा अभ्यास करत सारी काळजी यावेळी घेतली जाणार आहे. तसेच जनावरांना या कालावधीमध्ये बांधून न ठेवण्याच्या सुचना देखील देण्यात आलेल्या आहेत. भरतीची शक्यता लक्षात घेता किनारी भागात देखील काळजी घेणार असून 5 तालुक्यांमध्ये बोटी, प्रशिक्षित कर्मचारी तैनात करून ठेवणार असल्याची माहिती देखील यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली. खाडी किनारी भागात देखील योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. 


'धरण भागात विशेष काळजी'


200 मिलिमीटरपर्यंत होणारा पाऊस आणि तिवरे सारखी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धरणांबाबत आणि त्याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत संबंधित विभागांना योग्य त्या सुचना देण्यात आल्याची माहिती देखील यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. या कालावधीत लेप्टो स्पायरासीस सारख्या आजारांची शक्यता लक्षात घेता आरोग्य विभागांना देखील सतर्क करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील ऑक्सिजनचा बफर स्टॉक किंवा रूग्णालयांमधील विजेबाबत देखील योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना संबंधित विभागांना करण्यात आल्या आहेत.